मुंबई: निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने आणि किरकोळ महागाई दर सरलेल्या सप्टेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याच्या नकारात्मक परिणामांची मंगळवारी प्रमुख निर्देशांकात घसरण दिसून आली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५२.९३ अंशांनी घसरून ८१,८२०.१२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. सत्रांतर्गत ३३७.४८ अंशांच्या नुकसानीसह ८१,६३५.५७च्या सत्रातील नीचांकी पातळीला त्याने स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७०.६० अंशांची घसरण झाली आणि तो २५,०५७.३५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>>‘रेमिटन्स’ प्रक्रिया गतिमान, किफायती बनावी; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भूमिका
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्र, टाटा मोटर्स, कोटक महिंद्र बँक आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे समभाग तेजीसह स्थिरावले.
जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीतील ताजी तीव्र घसरण ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर अपेक्षेहून अधिक असा ५.४९ टक्क्यांवर नोंदवला गेल्याने त्याने मध्यवर्ती बँकेसह, सरकारच्या चिंतेतही भर घातली आहे. ही बाब गांभीर्याने घेत यामुळे मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण समितीकडून रेपो दरकपात २०२५ पर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार यांनी मत व्यक्त केले.
हेही वाचा >>>खाद्यान्नांच्या किमतीतील भडक्याने कहर; किरकोळ महागाई साडेपाच टक्क्यांच्या नऊमाही उच्चांकाला
रिलायन्स इंडस्ट्रीजला ३८,८११ कोटींची झळ
रिलायन्स इंडस्ट्रीजने सोमवारी जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या निव्वळ नफ्यात ५ टक्क्यांची घसरण नोंदवली. परिणामी मंगळवारच्या सत्रात समभागात झालेल्या दोन टक्क्यांहून अधिक घसरणीने कंपनीचे बाजारभांडवल ३८,८११ कोटींनी घसरून १८.१८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. रिलायन्सच्या समभागाने गेल्या तीन महिन्यांत उणे (-) १५.८५ टक्के परतावा दिला आहे. तर महिन्याभरात समभाग ८.७३ टक्क्यांनी घसरला आहे. मंगळवारच्या सत्रात समभाग ५७ रुपयांनी घसरून २,६८८.०५ रुपयांवर बंद झाला.