लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बुधवारच्या सत्रात प्रथमच ८५,००० या विक्रमी पातळीच्या पुढे स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २६,००० अंशांचा उच्चांक गाठला. बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या चमकदार कामगिरीमुळे मंगळवारच्या सत्रातील नुकसान भरून काढण्यास मदत झाली.
बुधवारच्या सत्रात दिवसअखेर सेन्सेक्स २५५.८३ अंशांनी वधारून ८५,१६९.८७ या ऐतिहासिक उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३३३.३८ अंशांची मुसंडी मारत ८५,२४७.४२ या विक्रमी शिखरावर पोहोचला होता. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २० कंपन्यांचे समभाग तेजीसह तर उर्वरित १० कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टी ६३.७५ अंशांनी वधारून प्रथमच २६,००४.१५ च्यावर बंद झाला. त्याने सत्रात २६,०३२.८० या उच्चांकी शिखराला स्पर्श केला होता.
हेही वाचा >>>सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
श्रेणी-बद्ध व्यवहारानंतर, पॉवर आणि बँकिंग समभागांच्या नेतृत्वाखाली निर्देशांक बंदच्या दिशेने झेपावले, तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड- आणि स्मॉल-कॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली. परदेशी निधीचा ओघ घटल्याने आणि इतर देशांमधील भांडवली बाजाराच्या स्वस्त मूल्यांकनामुळे त्या उदयोन्मुख बाजारांकडे निधी स्थलांतरित झाल्यामुळे देशांतर्गत बाजाराला अल्पकालीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असे मत जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले. तर टेक महिंद्र, टाटा मोटर्स, टायटन, कोटक महिंद्र बँक, स्टेट बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी २,७८४.१४ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ८५,१६९.८७ २५५.८३ ( ०.३०%)
निफ्टी २६,००४.१५ ६३.७५ ( ०.२५%)
डॉलर ८३.६० -३
तेल ७४.९१ -०.३५