मुंबई : जागतिक सकारात्मकतेचा माग घेत देशांतर्गत भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात अर्ध्या टक्क्याहून अधिक उसळला. तथापि बाजारात तेजीवाल्यांचा खरेदीपूरक जोर असतानाही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ६१ हजार अंशांची पातळी ओलांडण्यास अपयशी ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६१.०१ अंशांनी वधारून ६०,९२७.४३ अंशांवर बंद झाला. दिवसभरात ४२०.२६ अंशांची झेप घेत सेन्सेक्सने ६०,९८६.६५ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. सलग दोन सत्रांतील वाढीने सेन्सेक्समध्ये १,०८२ अंशांची भर पडली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११७.७० अंशांनी वधारला आणि तो  १८,१३२.३० पातळीवर स्थिरावला.

सरलेल्या आठवडय़ातील झालेल्या नुकसानातून भांडवली बाजार सावरत असून जागतिक सकारात्मकेने गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. याचबरोबर चीनमध्ये करोना निर्बंध शिथिल केल्याच्या वृत्तामुळे धातू कंपन्यांच्या समभागांना पुन्हा लकाकी आली आहे. मात्र त्याचबरोबर अमेरिकेत आलेल्या हिम वादळांमुळे तेलासह इतर जिन्नसांचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने जागतिक पातळीवर तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, विप्रो, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा आणि टायटन यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर हिंदूस्थान युनिलिव्हर, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नेस्ले कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात ४९७.६५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दिवसांपासून पिंपामागे ८० डॉलरवर असलेले खनिज तेलाचे दर मंगळवारी ०.४९ टक्क्यांनी वधारून प्रति पिंप ८४.३३ डॉलरवर चढले आहेत.

रुपयात २० पैशांची घसरण

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत मंगळवारच्या सत्रात रुपयाने २० पैशांची आपटी खात ८२.८५ रुपयांची पातळी गाठली. जागतिक पातळीवर आयातदारांकडून परदेशी गुंतवणूकदारांकडून आटलेला निधी ओघ आणि महिनाअखेर तेल कंपन्यांकडून नोंदवली जाणारी अमेरिकी चलनाच्या मागणी नोंदही रुपयाला अधिक कमकुवत करणारी ठरली. मंगळवारी डॉलरमागे ८२.८५ वर बंद झालेल्या रुपयाने ८२.७१ या मजबूत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान स्थानिक चलन ८२.६९ पर्यंतच वाढू शकले, तर ८२.८७ हा त्याचा तळ राहिला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex on the threshold of 61 thousand 1082 marks in two consecutive sessions ysh