लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत आघाडीवर सलग चौथ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी गुरुवारी १ टक्क्यांहून अधिक आगेकूच कायम राखली. अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने विद्यमान वर्षासाठी व्याजदर कपातीचा अंदाज कायम राखल्यानंतर जागतिक पातळीवर भांडवली बाजारांमध्ये संचारलेल्या उत्साहाचे प्रतिबिंब स्थानिक बाजारात उमटले.

बाजारातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि माहिती-तंत्रज्ञान समभागांमधील जोरदार खरेदीमुळे निर्देशांकांना बळ मिळाले. गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८९९.०१ अंशांनी (१.१९ टक्के) वधारून ७६,३४८.०६ पातळीवर स्थिरावला आणि त्याने पाच महिन्यांपूर्वी मागे सोडलेली ७६,००० ची पातळी पुन्हा गाठली. दिवसभरात त्याने १,००७.२ अंशांची झेप घेत ७६,४५६.२५ उच्चांकापर्यंत मजल मारली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २८३.०५ अंशांची (१.२४ टक्के) भर घातली आणि त्याने २३,००० अंशांचा टप्पा पुन्हा गाठत, २३,१९०.६५ वर 

दिवसअखेरीस बंद नोंदविला

अमेरिकी डॉलर निर्देशांकांच्या सततच्या घसरणीमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) समभाग विक्रीची तीव्रता कमी झाली आहे. तसेच देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी सुरू ठेवली आहे, ज्यामुळे अलीकडे निर्देशांकांमध्ये वाढ दिसून येत असून तेजीवाले पुन्हा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, भारती एअरटेल, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी बँक आणि टाटा मोटर्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले. मात्र तेजीच्या वातावरणात इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागांची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली.

श्रीमंतीत १७.४३ लाख कोटींची भर

गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत गेल्या चार सत्रात १७.४३ लाख कोटींची भर पडली आहे. या चार सत्रात सेन्सेक्सने २५१९.१५ अंशांची म्हणजेच ३.४१ टक्क्यांची कमाई करत, पुन्हा एकदा ७६,००० अंशांची पातळी गाठली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १७.४३ लाख कोटी रुपयांनी वधारून ४०८.६१ लाख कोटी (४.७३ ट्रिलियन डॉलर) रुपयांवर पोहोचले आहे.

सेन्सेक्स ७६,३४८.०६ ८९९.०१ ( १.१९%)

निफ्टी २३,१९०.६५ २८३.०५ ( १.२४%)

तेल ७१.०१ ०.३२%

डॉलर ८६.३६ -१ पैसा

Story img Loader