मुंबई : निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर समभाग विक्रीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांनी घसरले. परदेशी निधीच्या निर्गमनामुळे आणि तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीच्या चिंतेने गुंतवणूकदारांना ग्रासले आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५२८.२८ अंशांची घसरण झाली आणि तो ७८,००० अंशांच्या पातळीखाली ७७,६२०.२१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६०५.५७ अंश गमावत ७७,५४२.९२ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६२.४५ घसरून २३,५२६.५० पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>>‘एलआयसी’ची महिलांसाठी विशेष योजना; मिळणार ७ हजार रुपये महिना मानधन
अमेरिकी रोख्यांमधील विक्रीनंतर गुंतवणूकदारांनी सावधपवित्रा घेतला. त्याचे प्रतिकूल पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारासह आशियातील भांडवली बाजारांमध्ये उमटले. अमेरिकेतील १० वर्षे मुदतीच्या रोखे उत्पन्नावरील परतावा दर एप्रिल २०२४ नंतरच्या सर्वोच्च पातळी आहे, ज्यामुळे फेडकडून व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाली आहे. तसेच चीनमधील वाढत्या महागाईने दबाव वाढला आहे. त्याच्या सरकारने देऊ केलेल्या प्रोत्साहन योजना बाजाराला पुनरुज्जीवित करण्यात अपयशी ठरल्या आहेत, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा स्टील, झोमॅटो, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्र अँड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स आणि भारती एअरटेल या कंपन्यांची कामगिरी चमकदार राहिली.
सेन्सेक्स ७७,६२०.२१ -५२८.२८ (-०.६८%)
निफ्टी २३,५२६.५० – १६२.४५ (-०.६९%)
तेल ७६.०५ -०.११%
डॉलर ८५.८६ – ५ पैसे