लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जागतिक भांडवली बाजारांमधील तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या सत्रात समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १,१३१ अंशांनी वधारून पुन्हा ७५ हजारांच्या पातळीवर पोहोचला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने मंगळवारच्या सत्रात १,१३१.३१ अंशांची म्हणजेच १.५३ टक्क्यांची कमाई करत ७५,३०१.२६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,२१५.८१ अंश सर करत ७५,३८५.७६ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३२५.५५ अंशांची वाढ झाली आणि तो २२,८३४.३० पातळीवर पोहोचला.अनुकूल जागतिक कल आणि देशांतर्गत आशावादामुळे भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण होते.

अमेरिका आणि चीनमधील सुधारित किरकोळ विक्रीच्या आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड आणि स्मॉलकॅप समभागांची कामगिरी चांगली राहिली. तसेच डॉलर निर्देशांकात अलीकडेच झालेली घसरण आणि खनिज तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या उभारीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र अमेरिकी व्यापार धोरणांच्या अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका तूर्त कायम राहिल, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, झोमॅटोने ७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, टायटन, कोटक महिंद्र बँक आणि स्टेट बँकेचे समभाग तेजीसह बंद झाले. मात्र, तेजीच्या वातावरण असूनही बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, टेक महिंद्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची कामगिरी निराशाजनक राहिली. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्सने पाच दिवसांच्या घसरणीला खंड पाडत त्रिशतकी झेप घेतली होती. या सत्रातही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,४८८.४५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ६,०००.६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली होती.

रुपयाला ६७ पैशांचे बळ

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी वधारला असून तो प्रति डॉलर ८६.५५ पातळीवर स्थिरावला. रुपयाच्या वाढीचे हे सलग तिसरे सत्र आहे. या दरम्यान त्यात एकूण ६७ पैशांची भर पडली आहे.

सकारात्मक देशांतर्गत शेअर बाजार आणि कमकुवत अमेरिकी चलन यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी वधारला. अमेरिकेतील निराशाजनक आर्थिक आकडेवारीमुळे डॉलरची घसरण झाली, असे विश्लेषकांनी सांगितले. शिवाय, आशियाई चलनांच्या मजबुतीमुळेही रुपयाला आधार मिळाला. मात्र, खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ही वाढ मर्यादित राहिली.मंगळवारच्या सत्रात रुपयाने ८६.७१ प्रतिडॉलर पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रात त्याने प्रति डॉलर ८६.५४ रुपयांचा उच्चांक आणि ८६.७८ चा नीचांक गाठला. सोमवारी देखील डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी वधारला होता.

गुंतवणूकदारांच्या पदरी ८.६७ लाख कोटींची संपत्ती

सलग दोन सत्रातील बाजार तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८.६७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. जागतिक बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्सने दोन सत्रात १,४७२ अंशांची कमाई केली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८.६७ लाख कोटी रुपयांनी वाढून ३९९.८५ लाख कोटी रुपयांवर (४.६१ ट्रिलियन अमेरिकी डॉलर) पोहोचले आहे. मंगळवारच्या एका सत्रात, बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या बैठकींपूर्वी जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण आहे.

सेन्सेक्स ७५,३०१.२६ १,१३१.३१ १.५३%

निफ्टी २२,८३४.३० ३२५.५५ १.४५%

तेल ७२.१२ १.४८

डॉलर ८६.५५ -२६ पैसे

Story img Loader