Share Market Opening Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा फटका जगभरातील बाजारांना बसल्याचे पाहायला मिळाले होते. यादरम्यान अमेरिकेने भारतावर २६ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ट्रम्प यांच्याकडून यातून दिलासा देत भारतासह इतर काही देशांवरील अतिरिक्त आयात कर ९ जुलैपर्यंत म्हणजेच ९० दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारामध्ये पाहायला मिळाला. ९० दिवसांच्या या सवलतीनंतर सेन्सेक्स चांगलाच वर गेल्याचे पाहायला मिळाले.
व्हाईट हाऊसने आयात शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिल्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाल्याचे पाहायला मिळाले. फार्मा शेअर्समध्ये तेजी आल्याने एकंदरीत शुक्रवारी बेंचमार्क स्टॉक मार्केट निर्देशांक वर गेल्याचे दिसून आले. सकाळी ९:४३ वाजेपर्यंत एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १,३५३.५९ अंकांनी वाढून ७५,२००.७४ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी ५० ४४३.७० अंकांनी वाढून २२,८४२.८५ वर पोहोचला.
सकाळच्या सत्रामध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक ४.२५ टक्क्यांनी वाढले, त्यानंतर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचा शेअर ३.६९ टक्के वाढला. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये देखील ३.६२ टक्के वाढ पाहायला मिळाली, तर बजाज फिनसर्व्हने २.५६ टक्के आणि लार्सन अँड टुब्रोने २.५५ टक्के वाढ नोंदवली.
अगदी काही मोजक्या शेअर्सनीच खालच्या पातळीवर उघडले, अशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये १.१० टक्के इतकी सर्वाधिक घसरण पाहिला मिळाली. नेस्ले इंडिया देखील ०.४१ ने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ०.३४ टक्क्यांनी खाली गेला.
तर व्यावहाराला सुरूवात झाल्यानंतर निफ्टी फार्मा हा सर्वात चांगली कामगिरी करणारा ठरला, यामध्ये ३.०२ टक्के वाढ नोंदवली गेली. यापाठओपाठ निफ्टी मेटलने २.७१ टक्के वाढ नोंदवली. निफ्टी हेल्थकेअर निर्देशांकांने देखील २.३३ टक्के वाढ नोंदवली.
मीडिया स्टॉक्समध्ये देखील वाढ पाहायला मिळली, निफ्टी मीडिया निर्देशांक देखील १.९४ टक्क्यांनी वर केला तर निफ्टी Consumer Durables देखील १.६२ टक्क्यांनी वाढला. निफ्टी आयटी निर्देशांक १.३ टक्के, निफ्टी रिअॅलीटी देखील १.३७ टक्क्यांनी वाढला.
निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये देखील तेजी दिसून आली. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस १.३२ टक्के, निफ्टी पीएसयू बँक १.१६ टक्के आणि निफ्टी प्रायव्हेट बँक ०.९८ टक्क्यांनी वाढले. याबरोबरच निफ्टी ऑटो १.७८ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस १.२० टक्के आणि निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.४६ टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी मिडकॅप १०० मध्ये १.३८ टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये १.६९ टक्के वाढ पाहायला मिळाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम
२ एप्रिल रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर व्यापार कर लादले होते. यामध्ये जगभरातील ६० हून अधिक देशांचा समावेश होता. तर भारतासारख्या देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादले होते. अतिरिक्त व्यापारकर वाढीचा हा आदेश ९ एप्रिलपासून लागू झाला होता, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तो ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. पण, व्यापारकरावरील हे निलंबन हाँगकाँग, मकाऊ आणि चीनला लागू होणार नाही. याचबरोबर, व्हाईट हाऊसच्या आदेशात म्हटले आहे की, संबंधित देशांवर लादण्यात आलेला १० टक्के प्राथमिक व्यापार कर लागू राहणार आहे.