Sensex Update in Bombay Stock Exchange Today: सोमवारचा दिवस मुंबई शेअर बाजारासाठी कोलाहलाचा दिवस ठरला. जवळपास २४०० हून जास्त अंकांनी सेन्सेक्स कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचं सकाळच्या पहिल्याच सत्रात जवळपास १५ लाख कोटींचं नुकसान झाल्याचं दिसून आलं. गुंतवणूकदार सोमवारी दिवसभर शेअर मार्केटमधील घडामोडींमुळे हवालदील झाले होते. पण मंगळवारी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांना काहीसा धीर आला. सकाळच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्सनं एक हजारहून जास्त अंकांची उसळी घेत कालच्या पडझडीची काही अंशी भरपाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये हळूहळू सकारात्मक वाटचाल करणाऱ्या सेन्सेक्सनं गुंतवणूकदारांना दिलासा दिला. १०९२.६८ अंकांची उसळी घेत पहिल्याच सत्रात Sensex ७९,८५२.०८ वर पोहोचला. त्यानंतर काहीसा खाली येत ७९.६०६.५४ वर स्थिरावला.

Sensex पाठोपाठ निफ्टीचीही दमदार वाटचाल!

सेन्सेक्सनं चांगली कामगिरी नोंदवली असताना दुसरीकडे निफ्टी५०नंही दमदार वाटचाल केल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी निफ्टीची मोठी घसरण झाली होती. मात्र, मंगळवारी सकाळच्या सत्रात निफ्टी ५० नं २४,३५० चा टप्पा पुन्हा एकदा ओलांडला. सुरुवातीला २४,३८२.६० पर्यंत पोहोचलेला निफ्टी काही वेळानंतर थोडा खाली उतरून २४,२९४.६० वर आला. मात्र, कालच्या घसरणीवर आज निफ्टीनं जवळपास २३७ अंकांची भरपाई केली.

सेन्सेक्स-निफ्टीच्या तीव्र घसरणीचा घाव ; रुपयाचा प्रति डॉलर ८४.०९चा नीचांक

मुंबई शेअर बाजारातील व्यवहारांचं एकूण मूल्य मंगळवारी वाढून ४४१ लाख कोटींवरून ४४९ लाख कोटींपर्यंत पोहोचलं. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहारांच्या मूल्यात जवळपास ७ लाख कोटींची भर पडली.

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांतही उसळी

दरम्यान, मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शेअर बाजारांतही मंगळवारी उसळी पाहायला मिळाली. जपानमधील निक्केई २२५ नं इंट्राडे व्यवहारांत ११ टक्क्यांची वाढ नोंदवली. त्यामुळे २६३१.७८ ची वाढ नोंदवत या शेअर बाजारात ३४,०९०.२० वर व्यवहार चालू होते. दक्षिण कोरियातील कोस्पी शेअर बाजारात तब्बल ८१.३० अंकांची वाढ झाली. चीनमध्ये शांघाय शेअर बाजारात ०.५६ टक्क्यांची वाढ झाली. शांघाय बाजारात २८७६.८१ वर व्यवहार होत होते, तर हाँगकाँग शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ०.८८ टक्क्यांची वाढ होऊन १६,८४५.१० वर व्यवहार होत होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex today climbed up in bombay stock exchange nifty50 follows pmw