Stock Market Update: मुंबई शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण शुक्रवारीही कायम राहिली. शुक्रवारी शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर शेअर बाजार काहीसा वर जाऊन पुन्हा खाली आला. रुपयाचं प्रतिडॉलर ८५हून खाली अवमूल्यन झाल्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसू लागला असून सेन्सेक्ससह निफ्टीही अद्याप उलट्या दिशेनंच प्रवास करताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोट्यवधी गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडत आहे.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात Sensex ३८७.०८ अंकांनी अर्थात ०.४९ टक्क्यांनी खाली येऊन व्यवहार ७८,८३०.९७ वर सुरू झाले. त्यामुळे कधीकाळी ८० हजारांच्या वर झेप घेतलेल्या सेन्सेक्सनं गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठी घसरण नोंदवल्याचं दिसून येत आहे. त्याचवेळी Nifty50चीही सेन्सेक्सपाठोपाठ घसरण होण्याचा प्रघात शुक्रवारी कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीही ९०.२० अंकांनी खाली घसरून २३,८६१.५० वर आला. मुंबई शेअर बाजारातील एकूण १८११ लिस्टेड स्टॉकचे भाव पडले असून १४७७ शेअर्सचे भाव काहीसे वाढल्याचं दिसून आलं. पण १४७ स्टॉक्स त्यांच्या लोअर सर्किट लिमिटपर्यंत खाली आले.
शेअर मार्केटच्या पडझडीची कारणं काय?
दरम्यान, हवालदील गुंतवणूकदार आता एवढ्या पडझडीची कारणं काय याचा विचार करू लागले आहेत. यात सर्वात पहिलं कारण हे अमेरिकेतील केंद्रीय बँकेनं ४.५० टक्के व्याजदर थेट ०.२५ बेसिस पॉइंट्सनं कमी करून ४.२५ टक्क्यांवर आणल्याचं दिलं जात आहे. याचा फटका जगभरातल्या शेअर बाजारात कमी-अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचं जाणकारांचं मत आहे. याव्यतिरिक्त विदेशातील गुंतवणूकदारांकडून (FII) भारतातील इक्विटीची केली जाणारी विक्री हेदेखील या पडझडीमागील कारण सांगितलं जात आहे. गेल्या तीन सत्रांत मिळून ही विक्री तब्बल ८ हजार कोटींच्या घरात गेली आहे.
ए
रुपयाचं अवमूल्यन
याव्यतिरिक्त रुपयाचं दिवसेंदिवस होणारं अवमूल्यन हादेखील शेअर बाजारातील पडझडीतील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. गुरुवारी रुपयानं ८५.२ प्रतिडॉलर इतका ऐतिहासिक नीचांक गाठल्यानं भारतीय शेअर मार्केटला मोठा धक्का बसला.