Bombay Share Market Today: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचे तीव्र पडसाद जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेषत: इतर देशांवर टेरिफ लादण्यासंदर्भातले त्यांचे निर्णय जगभरातल्या गुंतवणूकदारांना हवालदील करणारे ठरले. भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत दिसणारी पडझड अजूनही कायम असून गुंतवणूकदारांसमोर आता पुढे काय? असा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकल्याचं दिसत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात BSE नं गुंतवणूकदारांना कोणताही दिलासा दिल्याचं दिसून आलं नाही.
यंदा घसरणीत Nifty50 आघाडीवर, Sensex चं पावलावर पाऊल!
एरवी सेन्सेक्समध्ये दिसणारा कल निफ्टी५०मध्ये पाहायला मिळतो पण सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर निफ्टी५० नं घसरणीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. सलग नवव्या सत्रात निफ्टी घसरला आहे. सलग सर्वाधिक सत्रांमध्ये कोसळण्याच्या निफ्टीच्या आकडेवारीत सोमवारच्या आकड्यांचा समावेश झाला आहे. याआधी मे २०१९ मध्ये निफ्टी अशाच प्रकारे सलग कोसळला होता.
एकीकडे निफ्टीनं उलटा रस्ता धरलेला असताना दुसरीकडे सेन्सेक्सकडूनही गुंतवणूकदारांची निराशाच झाली. सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स तब्बल ५९०.५७ अंकांनी कोसळला. ७३ हजार ३८३ अंकांवर असणाऱ्या सेन्सेक्समधली ही घट ०.७८ टक्क्यांच्या जवळपास आहे. निफ्टी १९६.१५ अंकांनी खाली येऊन २२ हजार ७३३.१० पर्यंत आला. शेअर बाजाराचा विचार करता एकूण शेअर्सपैकी ७६५ शेअर्स वधारले तर १९०१ शेअर्सची किंमत घटली. १५८ शेअर्सच्या किमती जैसे थे राहिल्या.
कुणाचा फायदा, कुणाचा तोटा?
मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, एकीकडे सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खात असताना दुसरीकडे निफ्टी-५० मध्येही काही ठिकाणी भाव वधारला असून काही ठिकाणी मोठी घसरण दिसून आली. निफ्टी रिअॅल्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी मीडिया यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खाली आले. हे प्रमाण प्रत्येकी १.५ ते २.५ टक्के इतं होतं. पण याच वेळी निफ्टी फार्मा, निफ्टी फार्मा आणि निफ्टी मीडिया हे शेअर्स वधारल्याचं पाहायला मिळालं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक बदल?
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे त्याचे दीर्घकालीन परिणाम शेअर बाजारावर होताना दिसून आले. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती सुधारण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. युक्रेन व रशियामधील दीर्घकाळ चाललेलं युद्ध संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचवेळी, कच्च्या तेलाच्या काही प्रमाणात घटणाऱ्या किमती, डॉलरचं अवमूल्यन आणि येत्या एप्रिल महिन्यातील आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात आणखी कपात होते का? याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलेलं आहे.