Stock Market Update: मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात विक्रमी कामगिरीने झाली. सेन्सेक्सनं आत्तापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. सकाळच्या सत्रात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सनं तब्बल ८०,०१३.७७ अंकांवर उसळी घेतली आहे. त्याचबरोबरीने निफ्टीनंही आपली कमाल दाखवली असून सकाळच्या सत्रात २४, २९१.७५ अंकांची मजल मारत सेन्सेक्सच्या वेगाने घोडदौड सुरू केली. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात भागधारकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
Sensex मध्ये ०.७२ टक्क्यांची वाढ!
सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सनं ०.७२ टक्क्यांची भर घालत ८०,०१३.७७ अंकांवर मजल मारली. शेअर बाजाराच्या आजपर्यंतच्या इतिहासात सेन्सेक्स ८० हजारांच्या वर गेला नव्हता. त्याचवेळी निफ्टी५०नंही आपला जोर कायम ठेवला. ०.७ टक्क्यांची भर घालत निफ्टीनं २४,२९१.७५ अंकांपर्यंत घोडदौड केली.
HDFC बँकेच्या शेअर्समध्ये ३.५ टक्क्यांची वाढ
दरम्यान, निफ्टीच्या आजच्या कामगिरीमध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या किमती ३.५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी झेप घेतल्यामुळे बँकिंग, वित्तसेवा आणि खासगी बँकांच्या शेअर्सनंही नफ्याच्या दिशेनं वाटचाल करत १.३ टक्के ते १.५ टक्क्यांपर्यंत मजल मारली.
एचडीएफसी बँकेप्रमाणेच आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि नेस्ले यांनी चांगली कामगिरी केली. त्याचवेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टिसीएस, सन फार्मा, इन्फोसिस, टाटा मोटर्स यांचे शेअर्स खाली आल्याचं दिसून आलं.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती?
आशियाई बाजारपेठेत सेऊल, टोक्यो आणि हाँगकाँगमधील शेअर बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळाली. त्याचवेळ शांघायमधील शेअर बाजाराचा प्रवास उलट्या दिशेने झाल्याचं दिसून आलं. अमेरिकेतील शेअर बाजारात मंगळवारी सकारात्मक वाटाचालीवर व्यवहार बंद झाले. त्यामुळे बुधवारी गुंतवणूकदारांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.