नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह तब्बल ७० खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे एकाच वेळी इतक्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्याचा वेगळाच विक्रम प्रस्थापित झालेला असताना दुसरीकडे शेअर मार्केटनंही या विक्रमी शपथविधीला तसाच विक्रमी प्रतिसाद दिला आहे. भारतीय शेअर मार्केटनं रविवारच्या शपथविधीनंतर सोमवारी पहिल्या तासाभरातच विक्रमी टप्पा गाठला. सेन्सेक्स आणि निफ्टीनंही मोठी उसळी घेत आत्तापर्यंतच्या उच्चांकी टप्प्याची नोंद केली!
सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं झेप घेतली. सकाळी साडेनऊच्या सुमारास निफ्टी ५० नं ०.३९ टक्क्यांची झेप घेत ९१.९० अंकांची भर घालताना २३,३८२.०५ पर्यंत मजल मारली. त्याचवेळी तब्बल २३३.११ अंकांची भर घालत सेन्सेक्सनं थेट ७६,९२६.४७ अंकांवर झेप घेतली. पुढच्या काही वेळातच निफ्टी५०नं आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी करत २३,४११.९० अंकांपर्यंत तर सेन्सेक्सनंही विक्रमी अंकांची नोंद करत ७७,०७९.०४ अंकांपर्यंत झेप घेतली.
अदानी, बजाजचा हातभार!
आज शेअर मार्केट उघडल्यानंतर अनेक कंपन्यांच्या शेअर्सनं उसळी घेतली. निफ्टीच्या विक्रमी कामगिरीमध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, बजाज ऑटो, कोल इंडिया आणि श्रीराम फायनान्स या कंपन्यांनी हातभार लावला. मात्र, त्याचवेळी टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, एलटीआय माइंड ट्री आणि हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअर्सची घसरण पाहायला मिळाली.
रविवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएच्या मित्रपक्षांतील खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. एकूण ७१ खासदारांनी पदाची शपथ घेतली. त्यात पंतप्रधान मोदी वगळता इतर ७० मंत्र्यांपैकी ६० मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. उरलेल्या मंत्र्यांमध्ये जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, चंद्राबाबू नायडूंची टीडीपी, शिवसेना एकनाथ शिंदे गट, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यनिहाय विचार करता सर्वाधिक मंत्रिपदं उत्तर प्रदेशमध्ये दिली असून दिल्ली व हरियाणामध्ये प्रत्येकी एकच मंत्रीपद देण्यात आलं आहे. हा मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला शपथविधी असून इतर इच्छुक उमेदवार व मित्रपक्षांना पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सामावून घेण्याचे संकेत भाजपातील नेतेमंडळींनी दिले आहेत. मात्र, मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याविषयी अद्याप निश्चित माहिती देण्यात आलेली नाही.