Sensex Today: गेल्या काही दिवसांत आस्ते कदम वाटचाल करणाऱ्या सेन्सेक्सनं शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील व्यवहारांना सुरुवात होताच सेन्सेक्स व पाठोपाठ निफ्टी ५० नंही विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या काहीशा सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर मार्केटमध्ये त्याचे पडसाद उमटल्याचं मानलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेन्सेक्स सर्वोच्च स्तरावर!

शेअर मार्केट सुरू होताच सुरुवातीच्या काही व्यवहारांनंतर सेन्सेक्सनं थेट ८२ हजार ६३७ पर्यंत मजल मारली. आत्तापर्यंतची ही सेन्सेक्सची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याचवेळी दुसरीकडे निफ्टी ५० नंही आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं असून थेट २५ हजारां झेप घेतली आहे. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये निफ्टी५०नं २५,२५७ पर्यंत उडी घेतली.

गेल्या १७ वर्षांमधील निफ्टीची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. कारण गेल्या ११ सत्रांमध्ये निफ्टीनं सातत्याने भरीव अशी वाढ नोंदवली आहे. गेल्या १७ वर्षांत अशा प्रकारे सलग सत्रांमध्ये वाढ नोंदवण्याची ही निफ्टीची सर्वोच्च सत्रसंख्या ठरली आहे.

BSEमध्ये बाजार मूल्य १.७५ लाख कोटींनी वाढलं!

मुंबई शेअर मार्केटमध्ये आज झालेल्या सकारात्मक वाटचालीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये एकूण १.७५लाख कोटींची वाढ झाली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबई शेअर बाजाराचं एकूण मूल्य ४,६२,५६,०७९ कोटी इतकं होतं. ३० ऑगस्ट म्हणजेच आज शेअर बाजार उघडल्यानंतर हे मूल्य ४,६४,३१,३४८ कोटींपर्यंत पोहोचलं. त्यामुळेच १.७५ लाख कोटींची वाढ नोंद झाली आहे.

सेन्सेक्सचे २५ शेअर ग्रीन झोनमध्ये

दरम्यान, सेन्सेक्सच्या या विक्रमी कामगिरीमुळे सेन्सेक्सवर लिस्टेड ३० पैकी २५ शेअर्स हे ग्रीन झोनमध्ये दाखल झाले आहेत. त्यातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, एलएंडटी आणि बजाज फिनसर्व यांचा समावेश आहे. दुसरीकडे टाट मोटर्स, टीसीएस व टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे.

Sensex News: तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ

दरम्यान, शेअर बाजारातील तब्बल १०१ शेअर्स हे गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम टप्प्यावर पोहोचल्याचं दिसून आलं. आज व्यवहार होत असलेल्या २५१५ शेअर्सपैकी १८३८ शेअर्सची वाढ होत असून ५४३ शेअर्सच्या दरांमध्ये घट होताना दिसत आहे. त्याशिवाय, १०१ शेअर्स गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम टप्प्यावर तर ६ शेअर्स वर्षभरातील सर्वात खालच्या स्तरावर आले आहेत. त्याशिवाय ७८ शेअर्स अपर सर्किटवर तर ५५ शेअर्स लोअर सर्किटपर्यंत पोहोचले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex today update climbed up to highest till date nifty 50 record break performance pmw