Go First pressures employees : दिवाळखोरीत निघालेली गो फर्स्ट विमान कंपनीच्या अडचणी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. अलीकडेच कंपनीने आपल्या दिवाळखोरीची माहिती दिली असली तरी या प्रकरणात एनसीएलटीची मंजुरी येणे बाकी आहे. परंतु विमान कंपनीचे कर्मचारी आताच नोकरी सोडत आहेत. अलीकडेच कंपनीच्या मोठ्या संख्येने कर्मचार्यांनी राजीनामा दिला आहे आणि ते इतर एअरलाइन्समध्ये सामील होत आहेत.
ज्यावर आता कंपनीने आपला आदेश जारी केला आहे. गो फर्स्ट एअरलाइन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यापूर्वी सहा महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्याने एका महिन्याची नव्हे तर ६ किंवा ३ महिन्यांची नोटीस बजावल्यानंतर तो कालावधी पूर्ण केल्यानंतरच कंपनी राजीनामा स्वीकारणार आहे. १२ मेपर्यंत या एअरलाइनची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हेही वाचाः राजकीय पक्षांचा फंड येतो कुठून? ९० टक्के निवडणूक रोखे पाच मोठ्या शहरांतून आले; त्यातही मुंबई आघाडीवर
एअरलाइन्सचा मास्टर प्लॅन काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन्सचे सीईओ कौशिक खोना यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या पायलटबरोबर टाऊनहॉल बैठक घेतली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पगार दिला जाईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. कंपनी अद्याप पूर्णपणे दिवाळखोरीत निघालेली नाही. ती स्वत:ला पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी कंपनी प्रॅट अँड व्हिटनी या इंजिन पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून त्यांचे नुकसान वसूल करेल आणि त्यांची सर्व थकबाकी भरेल. कंपनीच्या या भूमिकेमुळे ती स्वत:ला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
६ महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करा अन्यथा…
दुसरीकडे कंपनीने आपल्या कर्मचार्यांना या कठीण काळात नोकरी न सोडण्याची विनंती केली आहे. जर त्यांना जायचे असेल तर किमान ३ किंवा ६ महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करा. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळाल्याची बाबही समोर आली आहे. याशिवाय कंपनी राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनओसीही जारी करणार आहे, जेणेकरून त्यांना भविष्यात नोकरी शोधण्यात कोणतीही अडचण येऊ नये.