देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य इंजिन असलेल्या सेवा क्षेत्राची चक्रे मंदावली आहेत. सेवा क्षेत्राच्या सक्रियतेने मार्च महिन्यात त्यांच्या सात महिन्यातील उच्चांकी पातळीवरून माघारी फिरला आहे, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.
देशातील सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा पीएमआय निर्देशांक मार्च महिन्यात ५८.५ गुणांवर नोंदला गेला. याआधी फेब्रुवारीमध्ये हा गुणांक ५९ राहिला होता. मार्च २०२५ मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राची वाढ जोरदार राहिली असली, तरी फेब्रुवारीच्या तुलनेत ती थोडी कमी गतीने होती. हा निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तारपूरक आणि ५० गुणांखाली असल्यास त्यामध्ये आकुंचन झाल्याचे मानले जाते. हा निर्देशांक २०१३ च्या मध्यापासून ५० गुणांवर राहिला आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ या अखेरीस भारताच्या सेवा क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती अनुकूल राहिली. मजबूत मागणी आणि नवीन व्यवसाय कार्यादेशामुळे क्रियाकलापांमध्ये वाढ होत राहिली, असे निर्देशांकाच्या आकडेवारीने अधोरेखित केले आहे. तथापि, फेब्रुवारीच्या तुलनेत विक्री मंद गतीने वाढली. तरीही, सर्वेक्षण सहभागींनी ही वाढ अजूनही चांगली असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी, सेवा आणि उत्पादन क्षेत्राचा एकत्रित करणारा एचएसबीसी इंडिया संयुक्त पीएमआय निर्देशांक फेब्रुवारीमध्ये ५८.८ वरून मार्चमध्ये ५९.५ वर पोहोचला. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.
मार्चमध्ये भारतीय खासगी क्षेत्रातील क्रियाकलापांमध्ये जोरदार वाढ होत राहिली, कारण कंपन्यांनी नवीन कार्यादेशामध्ये आणखी वाढ झाल्याचे स्वागत केले. सेवासंबंधित उप-क्षेत्रांमध्ये, वित्त आणि विमा यांनी सर्वात मजबूत वाढ दर्शविली, त्यानंतर ग्राहक सेवांचा क्रमांक लागला. सर्व प्रमुख सेवा उद्योगांमध्ये व्यवसाय क्रियाकलाप आणि विक्रीत व्यापक वाढ झाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विक्री १५ महिन्यांतील सर्वात मंद गतीने वाढली, ज्यामुळे नवीन व्यवसायातील एकूण वाढ मर्यादित राहिली आहे.
किंमतीच्या बाबतीत, उत्पादन किमतीवरील दबाव पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. वाढत्या स्पर्धेमुळे आणि कमी किमतीमुळे, सेवा प्रदात्यांनी त्यांच्या किमती वाढवल्याचा दर सप्टेंबर २०२१ नंतरचा सर्वात कमकुवत पातळीवर पोहोचला आहे. सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांपैकी फक्त १ टक्के कंपन्यांनी फेब्रुवारीच्या तुलनेत त्यांच्या शुल्कात वाढ नोंदवली, तर उर्वरित कंपन्यांनी कोणताही बदल नोंदवला नाही. दुसरीकडे मार्चमध्ये सेवा क्षेत्रातील भरतीची क्रिया मंदावली होती. रोजगारात सरासरीपेक्षा अधिक वाढ झाली असली तरी, ती एका वर्षातील नीचांकी पातळीवर आहे. कंपन्यांकडे सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.