पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागणीच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विक्रीतील वाढ यामुळे भारताच्या सेवा क्षेत्राची वाढ जुलैमध्ये १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, असे मासिक सर्वेक्षणाच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षांनी स्पष्ट केले.सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती, एस ॲण्ड पी ग्लोबल इंडियाने प्रसिद्ध केलेल्या सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय निर्देशांक’ हा जूनमधील ५८.५ गुणांवरून जुलैमध्ये ६२.३ गुणांवर पोहोचला. गत १३ वर्षातील म्हणजेच जून २०१० पासून सेवा क्षेत्रातील सक्रियतेत नोंदवली गेलेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

उल्लेखनीय म्हणजे सलग २४ व्या महिन्यात, सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय निर्देशांक’ हा विस्तारपूरक राहिला आहे. या निर्देशांकाच्या परिभाषेत, त्याची ५० गुणांवर नोंद ही विस्तारदर्शक, तर ५० पेक्षा कमी गुण ही आकुंचन दर्शविणारी असते.अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सेवा क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. जुलैचे पीएमआय निर्देशांकाचे आकडे हे आत्तापर्यंत दुसऱ्या आर्थिक तिमाहीसाठी एकूण अर्थव्यवस्थेच्या (जीडीपी) वाढीमध्ये या क्षेत्राचे लक्षणीय योगदान दर्शविणारी आहे, असे या निर्देशांकाचा माग घेणाऱ्या एस ॲण्ड पी ग्लोबल इंटेलिजन्सच्या अर्थतज्ज्ञ व सहयोगी संचालिका पॉलीआना डी लिमा म्हणाल्या. त्यांच्या मते या उत्साहवर्धक आकड्याचे प्रत्यक्ष जीडीपी वाढीत समर्पक प्रतिबिंब उमटताना दिसून येतील.

सेवा क्षेत्रातील या तेजीचे मुख्य श्रेय हे नव्याने नोंदवली गेलेली दमदार मागणी आणि नवीन व्यवसायातील नफ्याला जाते. जुलै महिन्यात भारतीय सेवांच्या मागणीत मागील १३ वर्षांहून अधिक कालावधीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा आणि तीव्र वाढ दिसून आली आहे. सर्वेक्षणात सहभागी सुमारे २९ टक्के उद्योगांनी नवीन व्यवसायाच्या अधिक संधी खुल्या झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सेवा आणि निर्मिती क्षेत्राची सक्रियता एकत्रित मोजणारा एस ॲण्ड पी ग्लोबल इंडियाचा संमिश्र ‘पीएमआय निर्देशांक’ जूनमधील ५९.४ गुणांवरून जुलैमध्ये दमदारपणे ६१.९ गुणांवर पोहोचला.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विक्रीत झालेली वाढ ही विशेषत: आव्हानात्मक जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खूपच स्वागतार्ह बाब आहे. बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातींसह अनेक राष्ट्रांना सेवा निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे भारतीय कंपन्यांनी नोंदवले आहे.- पॉलीआना डी लिमा, अर्थतज्ज्ञ व सहयोगी संचालिका, एस ॲण्ड पी ग्लोबल इंटेलिजन्स

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Services sector growth hits 13y ear high in july the pmi index reached 62 3 points print eco news amy
Show comments