नवी दिल्ली : सेवा क्षेत्रातील मंदावलेली विक्री आणि या क्षेत्राच्या कंपन्यांच्या ढासळलेल्या व्यवसाय वाढीमुळे जानेवारीमध्ये भारतातील या क्षेत्राने सुस्पष्ट गतिरोध झाल्याचे दर्शवत, दोन वर्षातील नीचांकी सक्रियता नोंदवली, असे मासिक सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक डिसेंबरमधील ५९.३ वरून जानेवारीमध्ये ५६.५ वर आला. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० गुणांच्या खाली आकुंचनाचा निदर्शक मानला जातो. सेवा क्षेत्राचा वेग कमी झाला असला तरी पीएमआय ५० गुणांकापेक्षा अधिक राहिला आहे. व्यवसाय क्रियाकलाप आणि नवीन व्यवसाय पीएमआय निर्देशांक अनुक्रमे नोव्हेंबर २०२२ आणि नोव्हेंबर २०२३ नंतरच्या नीचांकी पातळीवर रोडावला आहे, असे एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले.
एकूण नवीन कार्यादेशाच्या कलाच्या विपरीत, आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीत जलद वाढ झाली. सर्वेक्षणातील सहभागींनी आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि अमेरिकेतील ग्राहकांकडून मिळविलेल्या कामांतून नफ्याची नोंद केली. एकूण विस्तार दर पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. मात्र नवीन निर्यात व्यवसायाने अंशतः घसरणीचा सामना केला. डिसेंबरमध्ये भारताच्या सेवा क्षेत्राने निर्यातीत चमक दाखवली होती आणि जागतिक व्यापाराचा मोठा वाटा उचलला होता, असे भंडारी म्हणाल्या.
नवीन व्यवसायाच्या सेवांमध्ये सतत सुधारणा आणि वाढत्या क्षमतेच्या दबावामुळे सेवा प्रदात्यांनी गेल्या आर्थिक तिमाहीच्या सुरुवातीला अतिरिक्त कर्मचारी भरती केली आहे. डिसेंबरपासून रोजगार निर्मितीचा दर वाढला आहे आणि दोन दशकांतील म्हणजेच डिसेंबर २००५ पासूनचा हा सर्वाधिक वेग राहिला आहे. किमतीच्या बाबतीत, सेवा कंपन्यांनी त्यांच्या खर्चात वाढ नोंदवली आहे. कर्मचाऱ्यांच्या वाढत्या खर्चाबरोबरीनेच, अन्नधान्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. वाढत्या खर्चाचा भार आणि मागणीतील लवचिकतेमुळे, कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, देशाच्या खासगी क्षेत्राचा जानेवारीमध्ये वाढीचा वेग काहीसा गमावला आहे. मात्र कारखाना उत्पादनात झालेल्या जलद वाढीने सेवा क्षेत्राची कसर भरून निघाली.