पीटीआय, नवी दिल्ली
देशातील सेवा क्षेत्राची सक्रियता ऑक्टोबरमधील सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दमदार मागणीमुळे मजबूत बनल्याचे मासिक सर्वेक्षणाने बुधवारी स्पष्ट केले. आधीच्या महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरमध्ये या क्षेत्राचा निर्देशांक दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता.
एचएसबीसी इंडियाने सेवा क्षेत्रातील व्यवसाय कामगिरीविषयी संकेत देणाऱ्या, खरेदी व्यवस्थापकांमधील सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय निर्देशांक’ सप्टेंबरमधील ५७.७ गुणांवरून, ऑक्टोबरमध्ये ५८.५ गुणांपर्यंत वधारला. या निर्देशांकाच्या परिभाषेत, ५० पेक्षा अधिक गुणांक म्हणजे विस्तार, तर ५० पेक्षा कमी गुण हे निराशाजनक कामगिरीला दर्शवितात.
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा
सरलेल्या ऑक्टोबरमध्ये, भारतीय सेवा क्षेत्राने ग्राहकांच्या मागणीत मजबूत वाढ अनुभवली तसेच रोजगार निर्मितीत लक्षणीय वाढ केली. या महिन्यांतील नवीन रोजगाराने २६ महिन्यांतील उच्चांक गाठला, असे एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले. विक्री आघाडीवरील सकारात्मक घडामोडींना प्रतिसाद म्हणून, तसेच नजीकच्या काळात व्यवसाय वाढीच्या आशावादाने, कंपन्यांनी दोन वर्षांनंतर कमाल प्रमाणात अतिरिक्त कामगारांची भरती केली. क्षमतेत वाढीच्या दबावामुळेही रोजगार निर्मितीला चालना मिळाली. सप्टेंबरमधील ९ टक्क्यांच्या तुलनेत सुमारे १३ टक्के सर्वेक्षणांत सहभागी सदस्यांनी ऑक्टोबरमध्ये रोजगारात वाढीची नोंद केली.
हेही वाचा >>>हिंदुस्थान झिंकमधील अडीच टक्के हिश्शाची अखेर सरकारकडून विक्री; गुंतवणूकदारांना १० टक्के सवलतीत ५०५ रुपयांना समभागांसाठी बोली शक्य
ताज्या सर्वेक्षणाने भारताच्या सेवा अर्थव्यवस्थेत नवीन निर्यात कार्यादेशांच्या वाढीवरही प्रकाश टाकला आहे. मुख्यत: आफ्रिका, आशिया, अमेरिका, ब्रिटन आणि आखाती देशांमधील ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे कंपन्यांनी सांगितले. तथापि, ऑक्टोबरमध्ये कच्चा माल व अन्य घटकांच्या किमतीतील वाढ ही तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. कंपन्यांनी त्यांच्या अतिरिक्त खर्चाचा भार कमी करण्यासाठी काही प्रमाणात विक्री किमती वाढवून ग्राहकांवर लादल्याचे सर्वेक्षणाने स्पष्ट केले.