लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशातील महिला श्रमशक्तीचा सहभाग जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याच्या समस्येकडे लक्ष वेधत महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी बँकांना उद्देशून केले.

महिलांसाठी अनुकूल व्यवसाय योजना आखून वित्तीय क्षेत्र महिला आणि पुरुषांमधील असमानतेची दरी भरून काढू शकतात, असे दास ‘फिक्की’ आणि ‘आयबीए’ने संयुक्तपणे आयोजित केलेल्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना म्हणाले. सर्वसमावेशक वाढीचे महत्त्व अधोरेखित करताना दास म्हणाले की, खऱ्या अर्थाने विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे झाल्यास नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक स्तराकडे दुर्लक्ष करून, म्हणजे कोणत्याही स्तरातील व्यक्तीचा वित्तीय सेवांमध्ये समावेश करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>‘बजाज हाऊसिंग फिन’पाठोपाठ अन्य ‘एनबीएफसी’ही सूचिबद्धतेचा मार्ग अनुसरणार!

देशातील महिला श्रमशक्तीचा सहभाग जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याचा उल्लेख करत त्यांनी मुलींचे शिक्षण, कौशल्य विकास, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सामाजिक अडथळे दूर करणे यासारख्या लक्ष्यित उपक्रमांची तातडीची गरज अधोरेखित केली. उद्योजकता हा आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे, मात्र देशात, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमधील (एमएसएमई) एक पंचमांशापेक्षा कमी मालकी अथवा नेतृत्व महिलांकडे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>>सेवा क्षेत्राची उच्चांकी सक्रियता, ऑगस्ट महिन्यात पीएमआय निर्देशांक ६०.९ गुणांवर

महिला उद्योजकांना अनेकदा भांडवलाची चणचण, प्रतिबंधात्मक सामाजिक नियम आणि परवडणाऱ्या वित्तपुरवठा मिळवण्यात अडचणी यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. यासाठी अनुकूल आर्थिक धोरणे राबवून, आर्थिक उत्पादने तयार करून आणि ‘फिनटेक’मधील नवकल्पनांचा लाभ घेऊन ही दरी भरून काढण्यात वित्तीय क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. वित्तीय संस्थांनी महिलांना उच्च रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे; आणि महिला उद्योजकांना पाठिंबा देऊन, सरकार प्रायोजित योजनांद्वारे तसेच बँकांच्या स्वतःच्या योजनांद्वारे महिलांच्या व्यवसायांना प्रोत्साहन देता येईल, अशा दोन आघाड्यांवर महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अर्थव्यवस्थेचे तेजीने मार्गक्रमण मात्र सुधारणांना वाव – दास

देशात वस्तू-सेवा उपभोग आणि गुंतवणुकीची मागणी सातत्याने वाढती असून अर्थव्यवस्था तेजीने मार्गक्रमण करत आहे. मात्र अजूनही जमीन, कामगार आणि कृषी बाजाराशीसंबंधित क्षेत्रांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बहु-आयामी आणि बहु-क्षेत्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. पुरवठा आणि मागणी या दोन्ही बाजूंनी वाढीची सर्व इंजिने वापरण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.