Go Abroad Shankar Sharma Appeals Indian Youth: जी क्वांट आणि फर्स्ट ग्लोबलचे संस्थापक शंकर शर्मा यांनी उत्तम गुंतवणूकदार बनू इच्छिणाऱ्या तरुण भारतीयांना देश सोडून जाण्याचा दिला आहे. एक्सवरील पोस्टमध्ये शर्मा यांनी तरुणांना परदेशात जाण्याचे, डॉलर्समध्ये कमाई करण्यासाठी कोणतीही नोकरी स्वीकारण्याचे आणि नव्या गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये आपले विचार मांडताना शर्मा यांनी लिहिले की, “गेल्या ३-४ वर्षांपासून अनेक भारतीय तरुण माझ्याकडे येतात आणि विचारतात की ‘मी एक उत्तम गुंतवणूकदार कसा बनू शकतो?’ मी म्हणतो, परदेशात जा. कोणतीही नोकरी करा, आखाती देशातील ड्रायव्हर देखील प्रति महिना ७५ हजार रुपये कमावतो. नव्या गोष्टी शिका. काही वर्षांत, तुमच्याकडे ज्ञान आणि अमेरिकी चलनामध्ये भांडवल असेल.’ “

भांडवल आणि ज्ञानाची सांगड

शर्मा पुढे असेही म्हणाले की, “एकदा लोकांनी भांडवल आणि ज्ञानाची सांगड घातली की जादू होईल.” त्यांनी यावर भर दिला की जे लोक भारतातून गुंतवणूक करतात बहुतेकदा “लॉक्ड कॅपिटल” वापरतात, स्थानिक मर्यादांमुळे ते मर्यादितच राहतात त्यामुळे मागे पडतात.

बाजारात दीर्घ कारकीर्द असलेले शर्मा यांनी सांगितले की. त्यांनी अनेक दशकांपूर्वी वैयक्तिकरित्या हा मार्ग निवडला होता. “१९९९ पासून मी माझे भांडवल मुक्त केले आणि हा माझा सर्वोत्तम गुंतवणूक निर्णय आहे,” असे शर्मा म्हणाले.

मला माझा देश आवडतो, पण…

दरम्यान शर्मा यांचे आवाहन अनेकांना धक्कादायक वाटू शकते, परंतु शर्मा यांनी स्पष्ट केले की, त्यांचा दृष्टिकोन भारताला नाकारण्याबद्दल नाही. “मला माझा देश आवडतो. पण मला माझ्या अनकेज्ड कॅपिटलचे (वापरात नसलेले भांडवल) अनेक देशांवर प्रेम करण्याचे स्वातंत्र्य जास्त आवडते,” असे त्यांनी लिहिले.

आम्ही जे भोगलं आहे ते…

यापूर्वी शंकर शर्मा यांनी इंडिया टुडे नेटवर्कशी साधलेल्या संवादात, सध्याच्या बाजारातील अस्थिरता आणि गेल्याकाही महिन्यांपासून होणाऱ्या एकूण घसरणीबद्दल आपले विचार मांडले होते. त्यांनी नवीन गुंतवणूकदार सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधून (SIP) बाहेर पडत असल्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले “शेअर मार्केटचा खेळ अशा प्रकारेच चालतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही जे भोगलं आहे ते त्यांनाही भोगू द्या.”