गेल्या महिन्याभरापासून देशात लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे प्रत्येक टप्प्यागणिक प्रचाराची आणि राजकीय भूमिकांची दिशा बदलत असताना दुसरीकडे निकालांबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. येत्या ४ जूनला देशभरात ५४२ जागांचे निकाल जाहीर होतील. मात्र, ७ टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात त्याचे पडसाद दिसून आले. अनेकदा सेन्सेक्स खाली किवा अचानक वर गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे ४ जूनला निकाल लागल्यानंतर नेमकं शेअर मार्केटमध्ये काय चित्र असेल? यावर गुंतवणूकदार कंपन्यांच्या उच्चपदस्थांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
बिझनेस टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या किंवा गुंतवणुकीसाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या किंवा ज्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात अशा काही कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निकालानंतरच्या शेअर मार्केटबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांच्यामते निवडणूक निकांलांचा मोठा परिणाम शेअर मार्केटवर दिसून येईल. भाजपाला बहुमत मिळाल्यास किंवा न मिळाल्यास बाजारपेठेत सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे,.
एनडीएला ३००हून अधिक जागांची अपेक्षा
प्रभुदास लिलाधर कंपनीच्या इन्स्टिट्युशनल रिसर्च विंगचे प्रमु अमनिश अग्रवाल यांनी एनडीएला ३०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची बाजारपेठेत अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांमध्ये सातत्य राहील आणि त्याचा सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यात होईल, असा त्यांचा कयास आहे. “आम्ही दुसऱ्या टोकाचा विचार सध्या करतच नाही आहोत, कारण आम्हाला ते होईल असं वाटत नाही”, असं त्यांचं म्हणणं आहे.
निफ्टी५० ची २५ हजारांवर झेप जाणार?
दरम्यान, भाजपाला मोठं बहुमत मिळालं, तर निफ्टी५० पुढच्या १२ महिन्यांत २५ हजार ३६३ वरून २५ हजार ८१० पर्यंत वर जाऊ शकतो, असं अग्रवाल म्हणाले आहेत. दुसरीकडे भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास निफ्टी नजीकच्या भविष्यात २४ हजाराचा टप्पा पार करेल, असा अंदाज अरिहंत कॅपिटल्सचे सहव्यवस्थापकीय संचालक अर्पित जैन यांनी वर्तवला आहे. मात्र, जर भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आलं, तर निफ्टी ५० थेट २०,५०० पर्यंत खाली येऊ शकतो असंही ते म्हणाले.
सेन्सेक्स ७८ हजार ५०० वर जाऊ शकतो?
भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर सेन्सेक्स थेट ७८ हजार ५०० अंकांवर जाऊ शकतो, अशी शक्यता रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष रवी सिंग यांनी वर्तवली आहे. “जर देशात २०१९ सारखेच निकाल लागले, तर निफ्टी कदाचित २३ हजार ५०० अंकांवर जाईल. तसेच, सेन्सेक्सही ७७ हजारांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, जर भाजपाला एकट्याच्या बळावर सरकार स्थापन करता आलं नाही आणि एनडीएच्या बहुमतावर सरकार आलं, तर सेन्सेक्स ७२ हजारापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. निफ्टीही २२ हजारांपर्यंत असेल”, असंही ते म्हणाले.
“भाजपासाठी ४०० पार सोपं नाही”
भारतीय जनता पक्षानं यावेळी एनडीएसाठी ४०० पार जागा जिंकण्याची घोषणा दिली आहे. मात्र, हे भाजपासाठी कठीण असेल, असं मत चॉईस वेल्थचे उपाध्यक्ष निकुंज सराफ यांनी व्यक्त केलं आहे. “गेल्या १० वर्षांत सत्ताधारी भाजपाविरोधातील अँटि-इन्कम्बन्सीचा फटका यावेळी बसू शकेल. त्यामुळे भाजपासह एनडीएनं गेल्या निवडणुकीइतक्या जागाही मिळवल्या, तरी ती त्यांच्यासाठी चांगली कामगिरी ठरेल”, असं सराफ म्हणाले आहेत. “गेल्या सहा महिन्यांत बाजारात चांगलं वातावरण असलं, तरी निकालाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसं शेअर मार्केटमध्ये चढउतार दिसू लागले आहेत”, असंही ते म्हणाले.
कुठल्या क्षेत्रांमध्ये अधिक संधी?
दरम्यान, भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास कोणत्या क्षेत्रांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवायला हवं, याबाबतही या कंपन्यांकडून मत व्यक्त करण्यात आलं आहे. “पीएसयू, रेल्वे, डिफेन्स, शेती आणि एमएनसीमधील उत्पादन क्षेत्र चांगली कामगिरी करू शकतात”, असं अरिहंत कॅपिटल्सचे जैन म्हणाले आहेत. तर “उत्पादन, संरक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल, एएमएस, पीएसयू, वित्तसेवा या क्षेत्रांमध्ये वाढ दिसू शकेल”, असा अंदाज अनंत राठी शेअर्स अँड स्टॉक्स ब्रोकर्सचे नरेंद्र सोलंकी यांनी व्यक्त केला आहे.