मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) अविरत सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा आणि युरोपीय बाजारातील कमकुवत संकेतामुळे बुधवारच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसअखेरीस जेमतेम सकारात्मक पातळीवर स्थिरावले, मात्र ६५ हजारांपुढील स्तर सेन्सेक्सला टिकवता आला नाही.
दिवसाचे व्यवहार थंडावताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३.२१ अंशांनी वधारून ६४,९७५.६१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६५,१२४ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली, मात्र ती टिकवून ठेवण्यात निर्देशांकाला अपयश आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात निफ्टीमध्ये ३६.८० अंशांची वाढ झाली आणि तो १९,४४३.५० पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा >>> मोदी सरकारकडून सर्व राज्यांकरिता नोव्हेंबर २०२३ साठी ७२,९६१.२१ कोटी रुपयांचं वाटप
देशांतर्गत भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून आली. मात्र दिवसअखेर बाजारावर तेजीवाल्यांनी ताबा मिळविला. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला दिलासा मिळेल. परिणामी महागाई आणि वित्तीय तूट आटोक्यात राहण्यास मदत होईल, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्स, टायटन, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, टेक महिंद्र, टाटा स्टील आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स ६४,९७५.६१ ३३.२१ ०.०५
निफ्टी १९,४४३.५० ३६.८० ०.१९
डॉलर ८३.२८ १
तेल ८१.७३ ०.१५