मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात धातू, कमॉडिटी आणि दूरसंचार कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळे सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारी १ टक्क्यांची उसळी घेतली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६८९.७६ अंशांनी वाढून ७१,०६०.३१ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने दिवसभरात सेन्सेक्स ७१,१४९.६१ अंशांची उच्चांकी तर ७०,००१.६० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २१५.१५ अंशांची भर घातली आणि तो २१,४५३.९५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 24 January 2024: सोने-चांदीच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव किती आहे?
जागतिक भांडवली बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे मंगळवारच्या सत्रातून सावरत बाजार पुन्हा उसळला. अर्थव्यवस्था आणि आर्थिक तरलतेला चालना देण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने राखीव गुणोत्तरात ०.५ टक्के कपात केल्यामुळे तेथील बाजारांना बळ मिळाले. मात्र देशांतर्गत कंपन्यांच्या समभागांचे वाढलेले मूल्यांकन आणि सरलेल्या तिमाहीतील कामगिरी अपेक्षेनुरूप नसल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असल्याने चिंता कायम आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>> सोने खरेदी करताय? मग त्याआधी हे वाचा; केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आयात शुल्कात १५ टक्के वाढीचा निर्णय
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचा समभाग ३.७७ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ एचसीएल टेक ३.६२ टक्क्यांनी
इंडसइंड बँक आणि पॉवरग्रिड अनुक्रमे ३.६० आणि ३.३४ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. टेक महिंद्र, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल हे देखील सकारात्मक पातळीवर स्थिरावले. दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि टीसीएसच्या समभागात प्रत्येकी २.९४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मंगळवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी ३,११५.३९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ७१,०६०.३१ +६८९.७६ (०.९८%)
निफ्टी २१,४५३.९५ +२१५.१५ (१.०१%)
डॉलर ८३.१३ – २
तेल ८०.०१ +०.५८