एप्रिलमधील विक्रमी जीएसटी संकलन, निर्मिती क्षेत्राशी संबंधित सकारात्मक पीएमआय आकडेवारी आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांनी गुरुवारी पुन्हा उसळी घेतली. गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२८.३३ अंशांनी वधारून तो ७४,६११.११ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३२९.६५ अंशांची कमाई करत ७४,८१२.४३ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३.३५ अंशांनी वधारून २२,६४८.२० पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>> नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी मध्यरात्री (भारतीय प्रमाण वेळेनुसार) व्याजदर आहे त्या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे कोणतेही नकारात्मक सावट न दिसता उलट निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. आगामी काळात फेडने महागाईबाबत सावध दृष्टिकोन कायम राखतानाच, संभाव्य दरकपातीचे संकेतही दिले आहेत. दुसरीकडे देशांतर्गत आघाडीवर वाहन निर्मात्या कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारले, असे निरीक्षण जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा >>> निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरून ५८.८ गुणांकावर
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन एप्रिलमध्ये १२.४ टक्क्यांनी वाढून २.१० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. मजबूत आर्थिक गती, देशांतर्गत व्यवहार आणि आयात वाढल्याने संकलन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे, असे अर्थमंत्रालयाने बुधवारी सांगितले. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’द्वारे, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा पीएमआय निर्देशांक मार्च महिन्यासाठी ५८.८ गुणांकावर पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, सन फार्मा, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग वधारले. कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग पिछाडीवर होते.