मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांनी आणि कर्जदात्या गटाने कंपनीच्या वित्तीय सेवा व्यवसाय म्हणजेच रिलायन्स स्ट्रॅटेजिक व्हेंचर्सच्या विलगीकरणास बुधवारी मान्यता दिली. विलग होणाऱ्या वित्तीय सेवा व्यवसायाचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड असे नामकरण करण्यात येणार आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स स्ट्रॅटेजिक व्हेंचर्सच्या विलगीकरणाच्या बाजूने सुमारे १०० टक्के मते पडली, असे रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांना त्यांच्या मूळ कंपनीमध्ये असलेल्या प्रत्येक समभागासाठी नव्याने उदयास येणाऱ्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा प्रत्येकी एक समभाग मिळणार आहे.
के.व्ही कामथ हे विलगीकरण झालेल्या संस्थेचे गैर-कार्यकारी अध्यक्ष असतील. लवकरच विलगीकरण झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध केले जातील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने सरलेल्या वर्षात ऑक्टोबर २०२२ मध्ये वित्तीय सेवा व्यवसायाच्या विलगीकरणास मान्यता दिली होती.गुरुवारच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.१८ टक्क्यांनी म्हणजेच २८.५० रुपयांनी उंचावून २,४४८.६० रुपयांवर स्थिरावला.