पीटीआय, नवी दिल्ली
कर्जजर्जर बनलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडला तिच्या भागधारकांनी समभाग आणि रोख्यांच्या माध्यमातून २०,००० कोटी रुपयांची निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती कंपनीने बुधवारी दिली. भांडवल उभारणीसाठी परवानगी मिळविण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची असाधारण सभा (ईजीएम) मंगळवारी पार पडली.
कंपनीच्या ईजीएममध्ये २०,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणी ठरावाच्या बाजूने भागधारकांनी ९९.०१ टक्के कौल दिला. कंपनीने प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी समभाग आणि रोखे यांच्या एकत्रित विक्रीतून एकंदर ४५,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीची योजना आखली आहे. भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील स्पर्धात्मक स्थिती सुधारण्यासाठी या निधी उभारणीतून मदत होईल अशी व्होडा-आयडियाला आशा आहे.
हेही वाचा >>>केंद्राचे ३४.३७ लाख कोटींचे कर महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण
बुधवारच्या सत्रात व्होडाफोन आयडियाचा समभाग किरकोळ वाढीसह १३.५५ रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार कंपनीचे ६७,९१२ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
लवकरच ‘एफपीओ’ शक्य
सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, निधी उभारणीचे पुढचे पाऊल म्हणून व्होडा-आयडियाकडून येत्या एक ते दोन आठवड्यांत ‘फॉलो-अप पब्लिक ऑफर (एफपीओ)’ अर्थात भांडवली बाजारात सार्वजनिकरीत्या समभाग विक्री केली जाण्याची शक्यता आहे. मात्र किती समभाग कोणत्या किमतीला विक्री करण्यात येतील याबाबत कंपनीने काहीही स्पष्ट केलेले नाही.