मुंबई : सरलेल्या वर्षातील सप्टेंबरपासून बाजारात सुरू झालेल्या पडझडीनंतर आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सततच्या समभाग विक्रीमुळे भांडवली बाजारावर ताण आहे. परिणामी नव्याने सूचिबद्ध झालेल्या अर्ध्याहून अधिक नवीन कंपन्यांचा परतावा कमी झाला असून, त्यांचे भाव ‘आयपीओ’च्या माध्यमातून मिळवलेल्या किमतीपेक्षा कमी झाले आहेत.सरलेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यातील अभूतपूर्व तेजीमुळे मुख्य मंचावर ७८ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून १.६ लाख कोटींची निधी उभारणी केली.

वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मजबूत बाजार परिस्थिती, गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि मोठ्या आकाराच्या सूचिबद्धतेमुळे प्राथमिक बाजारात उत्साहाचे वातावरण होते. यापैकी, ३४ कंपन्यांचे समभाग आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यांच्या ‘इश्यू’ किमतीपेक्षा कमी झाले आहेत, १० कंपन्यांचे समभाग सवलतीच्या दराने उपलब्ध आहेत आणि वर्षभर त्यांच्या इश्यू किमतीपेक्षा कमी राहिले, तर उर्वरित २४ कंपन्यांचे समभाग इश्यू किमतीपेक्षा अधिक किमतीवर सूचिबद्ध झाले. मात्र आता गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दाखवत आहेत.

गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. विक्री किमतीपेक्षा ५८ टक्क्यांहून अधिक घसरण समभागांत झाली आहे. त्यानंतर कॅरारो इंडिया आणि वेस्टर्न कॅरियर्स इंडिया यांचा क्रमांक लागतो, दोन्ही कंपन्यांचे समभाग इश्यू किमतीपेक्षा ५६ टक्क्यांपेक्षा खाली व्यवहार करत आहेत.इतर कंपन्यांमध्ये सरस्वती साडी डेपो, टोलिन्स टायर्स, श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग, ॲक्मे फिनट्रेड, इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी, सुरक्षा डायग्नोस्टिक आणि बाजार स्टाईल रिटेल यांचा समावेश आहे, जे सध्या त्यांच्या इश्यू किमतीपेक्षा ४०-५० टक्के खाली व्यवहार करत आहेत.

याव्यतिरिक्त, सूचिबद्धतेनंतर लक्षणीय वाढ झालेले सुमारे १० कंपन्यांचे समभाग आता त्यांच्या इश्यू किमतीच्या जवळ व्यवहार करत आहेत किंवा एक-अंकी नफा टिकवून आहेत.आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदार्पण केलेल्या ७८ कंपन्यांपैकी, ममता मशिनरी, बजाज हाऊसिंग फायनान्स, युनिकॉमर्स ई-सोल्यूशन्स, युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि डी डेव्हलपमेंट इंजिनीयर्स या पाच कंपन्यांनी दमदार पदार्पण केले. मात्र आता त्यांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये घट झाली आहे.बाजार घसरणीच्या या टप्प्यात केआरएन हीट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन, भारती हेक्साकॉम, क्वाड्रंट फ्युचर टेक आणि ओरिएंट टेक्नॉलॉजीजसारखे समभाग वाढीसह सूचिबद्ध झाले आणि अजूनही या समभागांमध्ये तेजी टिकून आहे.