लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
भांडवली बाजारातील व्यापक घसरणीमुळे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात सीडीएसएल, कॅम्स आणि एंजल वन यांसारख्या भांडवली बाजारकेंद्रित कंपन्यांच्या समभागावर तीव्र ताण आला असून, मागील महिनाभरात यातील काही कंपन्यांचे समभाग तब्बल ३० टक्क्यांपर्यंत आपटले आहेत.
भू-राजकीय अनिश्चितता आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) केलेल्या सततच्या समभाग विक्रीने एकंदर भांडवली बाजारात घसरण तीव्र झाली आहे. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांना या वाढत्या अस्थिरतेचा लक्षणीय फटका बसला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार अधिक चिंतातुर झाले आहेत.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील कंपन्यांच्या कामगिरीचे संमिश्र कल, मजबूत डॉलर आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर व्यापारविषयक आक्रमक धोरणाच्या भीतीमुळे भांडवली बाजारातील घसरण वाढली आहे. बाजार तेजीत लक्षणीय झळाळी मिळविलेल्या बाजारकेंद्रित कंपन्यांच्या समभागाकडे त्यामुळे आता गुंतवणूकदारांची पाठ फिरली आहे. गेल्या ३० दिवसांत एंजल वनचा समभाग २२ टक्क्यांनी घसरला आहे, तर मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) अनुक्रमे ११.२२ टक्के आणि २७ टक्के घसरले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद झालेल्या गुरुवारच्या सत्रात एंजल वन, एमसीएक्स आणि सीडीएसएल या तिन्ही कंपन्यांचे समभाग प्रत्येकी २ टक्क्यांपर्यंत घसरले.
सीडीएसएलची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. सरलेल्या ३१ डिसेंबर २०२४ अखेर या डिपॉझिटरीने १४.६५ कोटींहून अधिक डिमॅट खात्यांचा टप्पा गाठला. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीकडून सुमारे ९२ लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. कंपनीने एकत्रित करपश्चात नफ्यात वार्षिक २१.५ टक्के वाढ नोंदवली आहे, जो १३० कोटी रुपये आहे.म्युच्युअल फंड उद्योगासाठी हस्तांतरण प्रक्रिया हाताळणाऱ्या कॅम्स लिमिटेडच्या समभागांत २८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे, तर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने ३२ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली आहे. गुरुवारच्या व्यवहारात, कॅम्सचा समभाग ८.३६ टक्क्यांनी घसरून ३,६१५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला.
विश्लेषकांच्या मते, भांडवली बाजारातील सततच्या तेजीनंतर काही कंपन्यांच्या उच्च मूल्यांकनांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत नफावसुलीला प्राधान्य दिले आहे. मंदावलेली देशांतर्गत आर्थिक वाढ आणि अमेरिकी रोख्यांवरील वाढलेला परतावा आणि व्यापार धोरणांच्या अनिश्चिततेसह जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.