लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: मागील सहा महिन्यांत भांडवली बाजारातील प्रचंड अस्थिरतेत, म्युच्युअल फंडांच्या रोखेसंलग्न ‘शॉर्ट ड्युरेशन फंडां’नी गुंतवणूकदारांना बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त म्हणजेच ७.५१ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. तर तीन वर्षांत या योजनांचा परतावा वार्षिक सरासरी सात टक्क्यांपर्यंत राहिला आहे.
योग्य सुरक्षिततेसह स्थिर परतावा देणाऱ्या या योजना अल्पावधीचे गुंतवणूक उद्दिष्ट असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम ठरतात. जवळपास सर्व फंड घराण्यांकडून शॉर्ट ड्युरेशन या रोखेसंलग्न योजना गुंतवणुकीस उपलब्ध आहेत. ‘अर्थलाभ’कडून संकलित आकडेवारीनुसार, एका वर्षांत चांगला परतावा देणाऱ्या फंड घराण्यांमध्ये एचडीएफसीने ७.७२ टक्के, अॅक्सिसने ७.६१ टक्के, आदित्य बिर्ला सनलाइफने ७.५१ टक्के आणि निप्पॉन फंडाने ७.६० टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांत चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये एचडीएफसीने ६.६० टक्के, आदित्य बिर्लाने ६.५९ टक्के, अॅक्सिसने ६.४३ टक्के, आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने ७.०२ टक्के आणि बंधन फंडाने ६.१५ टक्के परतावा दिला आहे.

या प्रकारची फंड योजना कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्सचा माग घेते. दोन ते पाच वर्षांच्या कॉर्पोरेट बाँड आणि सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते. प्रामुख्याने एएए आणि ए१ प्लस आणि समतुल्य रेटिंग असलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली जाते. जसे सर्वोत्तम कामगिरी असलेली एक अॅक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंडाची कॉर्पोरेट बाँडमध्ये ६१ टक्के गुंतवणूक आहे तर सरकारी रोख्यांमध्ये ती २५ टक्क्यांहून अधिक आहे.

गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे या फंडात प्रवेश आणि निर्गमनाचे (एंट्री किंवा एक्झिट लोड) कोणतेही शुल्क नसते. गुंतवणूकदार ५,००० रुपयांची एकरकमी गुंतवणूक आणि १,००० रुपयांची मासिक ‘एसआयपी’ सुरू करू शकतात. जर कोणी २०१३ च्या सुरुवातीला अॅक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंडात १०,००० रुपये गुंतविले असते, तर ती रक्कम आता ३१ जानेवारी २०२५ अखेर २५,८२४ रुपये झाली असेल.

Story img Loader