महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील १९७ विकासकांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. यापैकी ९० विकासकांची सुनावणी होऊन १० हजार, २५ हजार, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण १८ लाख ३० हजारांचा दंड ठोठावला आहे . यापैकी ११ लाख ८५ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. यात मुंबई क्षेत्रातील ५२, पुणे क्षेत्रातील ३४ आणि नागपूर क्षेत्रातील ४ विकासकांचा समावेश आहे. उर्वरित म्हणजे १०७ विकासकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीला फक्त मुंबई मुख्यालयात याबाबत संनियंत्रण आणि सुनावण्या घेतल्या जात होत्या. आता मुंबईशिवाय पुणे आणि नागपूर या महारेराच्या क्षेत्रीय कार्यालयातही याबाबतचे संनियंत्रण आणि सुनावण्या सुरू झालेल्या आहेत. मुंबई क्षेत्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोकण, ठाणे इत्यादींचा समावेश आहे. पुणे क्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर या विभागांचा समावेश आहे तर नागपूर क्षेत्रात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचाः श्रीलंका ते जपान, भारतीय रुपयाला ‘या’ ५ देशांत अनुकूल चलन दर

या जाहिरातीत काही विकासकांकडे महारेरा क्रमांक असूनही तो त्यांनी जाहिरातीत छापला नाही किंवा वाचताही येणार नाही एवढ्या बारीक अक्षरात छापलेला होता. फेसबुक, ऑनलाईन आणि तत्सम समाज माध्यमांवरही अनेक जाहिरातीत महारेरा क्रमांक छापला जात नाही, असेही निदर्शनास आले आहे. स्थावर संपदा कायद्यानुसार ५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प( यात प्लाॅटसचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी , विक्री करता येत नाही . असे असले तरी काही विकासक या नियमाकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिराती छापत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले. त्याची महारेराने गांभीर्याने नोंद घेतली आणि अशा प्रकल्पांना
स्वाधिकारे ( Suo Motu) कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या जातात.

हेही वाचाः Money Mantra : मुदत विमा आणि जीवन विम्याबद्दल संभ्रम आहे? पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी फरक समजून घ्या

घर खरेदीदार आणि एकूणच स्थावर संपदा क्षेत्रातील गुंतवणूक सुरक्षित राहावी, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने हा स्थावर संपदा अधिनियम लागू केला आणि या क्षेत्राचे व्यवस्थित विनियामन व्हावे, यासाठी महारेराची स्थापना केली. महारेरा घर खरेदीदार आणि या क्षेत्रातील इतर गुंतवणूकदारांच्या वतीने अनेक मूलभूत बाबींची काळजी घेत असते. परंतु ग्राहकांनी देखील फक्त महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करण्याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन महारेराच्यावतीने करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show cause notices sent by maharera to 197 developers who printed advertisements without maharera numbers vrd