मुंबईः वनस्पती अर्कांच्या निर्यातप्रधान व्यवसायात साडेतीन दशकांपासून कार्यरत श्री अहिंसा नॅचरल्स लिमिटेडने सार्वजनिक प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ७३.८१ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
कंपनीकडून व्हिएतनाम, मेक्सिकोमधील मळ्यांमधून कच्च्या स्वरूपात कॅफीन आणि ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट्स मिळविते. ज्याचा उपयोग अन्न प्रक्रिया व पेये उद्योग, न्युट्रास्युटिकल्स, औषधनिर्माण आणि सौंदर्यप्रसाधने या क्षेत्रांतील कंपनीच्या ग्राहकांकडून केला जातो. श्री अहिंसा नॅचरल्सचे ६२ लाख समभाग विक्रीस खुले होत असून, त्यापैकी कंपनीचे प्रवर्तकांकडील ओएफएसच्या माध्यमातून २० लाख समभाग विकले जाणार आहेत.
प्रत्येकी ११३ रुपये ते ११९ रुपये किमतीला होणारी ही समभाग विक्री मंगळवार, २५ मार्चपासून ते गुरुवार, २७ मार्चपर्यंत खुली राहिल. ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी हा एसएमई आयपीओ असल्याने गुंतवणूकदारांना किमान १,२०० समभाग आणि त्या पटीत समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करावा लागेल.
विक्रीपश्चात कंपनीच्या समभागांची बाजारात संभाव्य सूचिबद्धता ही २ एप्रिल २०२५ रोजी होणे अपेक्षित आहे. भागविक्रीतून मिळणाऱ्या निधीपैकी ३५ कोटी श्री अहिंसा हेल्थकेअर या पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीत गुंतवणुकीसाठी वापरात येणार आहेत. तर राजस्थानातील सावर्डा, जयपूर या ठिकाणी उत्पादन सुविधा सुरू करण्यासाठीही निधी वापरला जाईल.