पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती केंद्र सरकारने शुक्रवारी केली. याचबरोबर एलआयसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक बी.सी.पटनाईक यांची भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एलआयसीच्या अध्यक्षपदासाठी मोहंती यांच्या नावाची शिफारस मागील महिन्यात वित्तीय सेवा संस्था विभागाने केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीच्या अध्यक्षपदी मोहंती यांची नियुक्ती ७ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. बी.सी.पटनाईक हे प्राधिकरणाच्या सदस्यपदी त्यांच्या वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या दोन्ही नियुक्त्यांचा आदेश काढला आहे. सध्या मोहंती हे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक असून, ते प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.