मुंबई: ‘सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड’मधील (सिल्व्हर ईटीएफ) व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ऑक्टोबर २०२४ अखेर चार पटींनी वाढून १२,३३१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २,८४४.७६ कोटी रुपये होते. वर्ष २०२२ मध्ये चांदीमधील गुंतवणूक पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांना ‘सिल्व्हर ईटीएफ’ योजना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

देशांतर्गत चलनवाढीचा दबाव आणि भू-राजकीय अनिश्चितता यापासून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याप्रमाणेच चांदीमध्येदेखील गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. सिल्व्हर ईटीएफअंतर्गत गुंतवणूकदार खाती अर्थात फोलिओंची संख्या ऑक्टोबर २०२४ मध्ये २१५ टक्क्यांनी वाढून ४.४७ लाखांवर पोहोचली आहे, जी वर्षापूर्वी फक्त १.४२ लाख होती.

गोल्ड ईटीएफपाठोपाठ सिल्व्हर ईटीएफदेखील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय बनली आहेत. बाजारात सिल्व्हर ईटीएफ योजनांची संख्या एप्रिल २०२३ मध्ये आठ होती. ती ऑगस्ट २०२४ अखेर १२वर पोहोचली आहे. आज ग्रामीण आणि शहरी भागात सोने न परवडणारा मोठा वर्ग आहे. त्यांना चांदीत गुंतवणूक करायची तर प्रत्यक्ष चिप किंवा बार घ्यावे लागतात. सोन्याच्या तुलनेत चांदी वजनाने जास्त आणि त्याची राखण किंवा वाहतूकही अधिक खर्चीक ठरते. याबरोबर चांदीच्या खरेदीवर जीएसटीशी संबंधित खर्चामुळे गुंतवणूकदार चांदीच्या ईटीएफला प्रत्यक्ष चांदी खरेदीपेक्षा प्राधान्य देत आहेत, असे ‘इक्रा अनॅलिटिक्स’चे वरिष्ठ उपाध्यक्ष अश्विनी कुमार म्हणाले. ‘सिल्व्हर ईटीएफ’द्वारे चांदीमध्ये डिमॅट युनिट्सच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यामुळे प्रत्यक्ष चांदी खरेदी करून ती दीर्घकाळासाठी बाळगण्यात येणाऱ्या कटकटी आणि खर्च यापासून मुक्ती मिळते.

हेही वाचा >>> बाजाराच्या आकस्मिक मुसंडीमागे, मतदानोत्तर चाचण्यांचा ‘कौल’?

परतावा कामगिरी कशी?

सिल्व्हर ईटीएफची परतावा कामगिरी उल्लेखनीय राहिली असून गोल्ड ईटीएफलाही तिने मात दिली आहे. १ महिना, ३ महिने, ६ महिने आणि १ वर्षाच्या कालावधीतील सरासरी परतावा अनुक्रमे ७.५७ टक्के, १६.०२ टक्के, २०.२५ टक्के आणि ३२.४९ टक्के राहिला.

सामान्य गुंतवणूकदाराला ‘सिल्व्हर ईटीएफ’चे फायदे चांदी हे गरिबांचे सोने असे म्हटले जाते. परंतु दुकानातून छोट्या-छोट्या तुकड्यांत चांदी घेणे किंवा चांदीच्या वस्तू घेणे अशा गुंतवणुकीतून आर्थिक फायदा क्वचितच होतो. याचे कारण म्हणून, दुकानातून मिळणारी चांदी किती शुद्ध असेल, त्याची लावलेली किंमत आणि एकदा ती विकत घेतल्यावर बाळगण्याची जोखीम अधिक त्यावरील खर्च हे घटक सांगितले जातात. शिवाय चांदीचे विशिष्ट कालावधीनंतर काळे पडणे आणि बाजारात विकण्याची वेळ आली तर प्रचलित बाजारभावावर लावली जाणारी घट पाहता गुंतवणुकीचे साधन म्हणून चांदीकडे पाहणे कठीण होते. यावर उत्तर म्हणजे कागदी स्वरूपात तसेच प्रचलित बाजारभावात चांदी खरेदी-विक्रीची मुभा देणारा ‘सिल्व्हर ईटीएफ’ हा अधिक चांगला पर्याय ठरतो. एकदा त्यात गुंतवणूक केली की, वर दिलेल्या सर्व समस्या ही त्या म्युच्युअल फंडाची जबाबदारी असते. त्यासाठी तुलनेने अतिशय क्षुल्लक शुल्क आकारून संबंधित फंड व्यवस्थापक ही जबाबदारी पार पाडत असतो.

Story img Loader