मुंबई: मागील सव्वा दोन वर्षात ७४० कोटी रुपयांच्या ठेवींची ऐतिहासिक वाढ करून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३,००० कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार करत, चार दशकांच्या बँकेच्या प्रगतीपर वाटचालीवर मानाचा तुरा खोवला आहे.
बँकेने नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्ष अखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे. राज्यातील जिल्हा बँकांमध्ये पहिल्या तीन क्रमांकात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अग्रगण्य राहिली आहे.
हेही वाचा >>> एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दरात नाममात्र घसरण; खाद्यान्नांच्या किमती मात्र अजूनही चढ्याच !
विद्यमान २०२४-२५ आर्थिक वर्षामध्ये बँकेने ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, ढोबळ नफा या सर्वच बाबतीत नविन उद्दिष्टे गाठण्याचा संकल्प करत त्यादृष्टीने सक्षमपणे वाटचाल सुरू केली असल्याचे दळवी यांनी नमूद केले. बँकेचा व्यवसाय ३१ मार्च २०२५ अखेर ६००० कोटी रुपयांवर नेण्याच्या उद्दिष्टासह, महिलांसाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील ९८ शाखांमार्फत जवळपास साडेसहा लाख खातेदारांना ही जिल्हा बँक सेवा पुरवीत आहे.