म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ गुंतवणुकीने सरलेल्या मे महिन्यात विक्रमी १४,७०० कोटी रुपयांच्या मासिक ओघाचा टप्पा ओलांडला असताना, मिडकॅप फंडातील ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांसाठी चांगलीच लाभकारक ठरली असल्याचे दिसत आहे. गत तीन वर्षांपासून या फंडांतील ‘एसआयपी’ वार्षिक सरासरी १० टक्क्यांवर परतावा दिला आहे.
एडेलवाईस म्युच्युअल फंडाच्या अहवालानुसार, १ एप्रिल २०२० ते १ मे २०२३ या कालावधीतील आकडेवारी पाहिली तर एडेलवाईस मिडकॅपमधील दरमहा हजार रुपये याप्रमाणे ३६,००० रुपये एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य ४६,३५२ रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे ही रक्कम टाटा मिडकॅपमध्ये ४४,१४० रुपये, यूटीआय मिडकॅपमध्ये ४३,८०२ रुपये आणि ॲक्सिस मिडकॅपमध्ये ४२,८०७ रुपये झाली आहे.
एडेलवाईस म्युच्युअल फंडाचे विक्री प्रमुख दीपक जैन यांच्या मते, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एसआयपी हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजे केव्हा गुंतवायचे, किती गुंतवायचे आणि किती काळासाठी हे सर्व ही पद्धतीच सांगते. बाजारातील घसरणीमुळे घाबरून तुम्ही तुमची एसआयपी बंद केली तर त्यामुळे मोठे नुकसान होते. उदाहरणार्थ, ३१ ऑगस्ट २००७ ते ३१ जुलै २००८ दरम्यान जागतिक आर्थिक संकटाचा काळ होता. यावेळी ज्यांनी एसआयपी बंद केली त्यांना त्या वर्षभराच्या काळात २६ टक्के तोटा झाला. या उलट, ज्याने ३१ ऑगस्ट २००७ ते ३१ ऑगस्ट २०१० पर्यंत ज्यांनी एसआयपी कायम ठेवली, त्यांना वार्षिक सरासरी १६ टक्के दराने परतावा मिळवला.
हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता
याचप्रमाणे ज्यांनी ३१ डिसेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०२० या कालावधीत एसआयपी बंद केली, त्यांचे १६ टक्के नुकसान झाले. परंतु ३१ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ज्यांनी आपली गुंतवणूक कायम ठेवली त्यांना वार्षिक सरासरी १३ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. उल्लेखनीय म्हणजे दहा वर्षे व अधिक काळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी कधीही तोटा केलेला नाही. एडेलवाईस बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाने ११ टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. फंडाने सुरुवातीपासूनच्या गुंतवणूकदारांना १०.४८ टक्के दराने, तर फंडाचा १० वर्षांतील परताव्याचा दर १०.५३ टक्के, सात वर्षांचा १०.७८ टक्के, पाच वर्षांसाठी ११.१६ टक्के आणि तीन वर्षांसाठी ९.३३ टक्के असा राहिला आहे.
हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी