मुंबईः तंत्रज्ञानाधारित आरामदायी वस्तूंच्या क्षेत्रातील नवोद्यमी उपक्रम ‘द स्लीप कंपनी’ने आगामी २०२५ आर्थिक वर्षाअखेरीस नफाक्षम बनण्याची आणि आर्थिक वर्ष २०२७ अखेर १,००० कोटींच्या महसुली उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. स्लीप या नाममुद्रेखाली कंपनीकडून आरामखुर्च्या, गाद्या, रिक्लायनिंग पलंग अशी उत्पादने बनविली जातात.
हेही वाचा >>> Three M Paper Boards IPO : थ्री एम पेपर बोर्ड्स ‘आयपीओ’तून ३९.८३ कोटी उभारणार
स्थापनेपासून अल्पावधीतच, द स्लीप कंपनीने ५०० कोटी रुपयांच्या वार्षिक आवर्ती महसुलाचा टप्पा गाठला आहे. प्रियांका आणि हर्षिल सालोट यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेली ही कंपनी म्हणजे स्मार्टग्रिड तंत्रज्ञानाची ती जगातील पहिली आणि एकमेव प्रदाता असल्याचा दावा करते. जून २०२२ मध्ये बेंगळूरुमध्ये पहिले विक्री दालन उघडणाऱ्या कंपनीची सध्या स्व-मालकीची आणि स्व-संचालित दालनांची संख्या १०० झाली आहे. कंपनीच्या कमाईपैकी सुमारे ६५ टक्के महसून ऑफलाइन दालनांमधून, तर उर्वरित ऑनलाइन विक्रीतून येतो. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये, ऑफलाइन आणि ऑनलाइन विक्री महसुलाचे प्रमाण समसमान होते. तथापि, कंपनीने विक्री दालनांची संख्या लक्षणीय वाढवली आणि त्यात आणखी विस्ताराचे नियोजन पाहता, ऑफलाइन विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, असे हर्षिल सालोट म्हणाले.