मुंबई: सौर ऊर्जा प्रकल्पांच्या परिपूर्ण अंमलबजावणीच्या क्षेत्रात कार्यरत सोलेरियम ग्रीन एनर्जी लिमिटेडने ‘बीएसई एसएमई’ मंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) १०५ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. गुरुवार, ६ फेब्रुवारी ते सोमवार १० फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या या भागविक्रीसाठी कंपनीने प्रत्येकी १८१ रुपये ते १९१ रुपये किंमतपट्टा निर्धारीत केला आहे.
या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या निधीतून खेळत्या भांडवलाच्या गरजा कंपनी पूर्ण करणार आहे. बीलाइन कॅपिटल ॲडव्हायजर्स हे या भागविक्रीचे व्यवस्थापक, तर लिंक इनटाइम इंडिया हे निबंधक आहेत. कंपनीने एप्रिल २०२१ पासून, सप्टेंबर २०२४ पर्यंत, एकूण ११,१९५ निवासी छतावरील सौर वीज प्रकल्प, १७२ व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्प आणि १७ सरकारी प्रकल्प पूर्ण केले आहेत. ३१ डिसेंबर २०२४ अखेर कंपनीकडे १८५ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे कार्यादेश आहेत. या व्यतिरिक्त ८८५ कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पांसाठी कंपनीने बोली लावली आहे.
सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन यामुळे सौर विजेची स्थापित क्षमता दरसाल ८ ते १० गिगावॉटने वाढत आहे. भारताचे २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय्य ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य लक्षात घेता, कंपनी या अंगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि या क्षेत्रात ईपीसी सेवेतील अग्रणी म्हणून पुढे येईल, असा विश्वास सोलेरियम ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंकित गर्ग यांनी व्यक्त केला.
रेडी मिक्स कन्स्ट्रक्शनची आजपासून १२१ ते १२३ रुपयांनी भागविक्री
मुंबई: अभियांत्रिकी सेवा, उपाय क्षेत्रातील २०१२ मध्ये स्थापित रेडी मिक्स कन्स्ट्रक्शन मशिनरी लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली असून, याद्वारे ३७.६६ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.
गुरुवार, ६ फेब्रुवारी ते सोमवार १० फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या या भागविक्रीसाठी कंपनीने प्रत्येकी १२१ ते १२३ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. ‘आयपीओ’पश्चात कंपनीचे समभाग ‘एनएसई ईमर्ज’ बाजारमंचावर सूचीबद्ध केले जातील. हेम सिक्युरिटीज लिमिटेड या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत असून, हेम फिनलीज प्रायव्हेट लिमिटेड ही आयपीओसाठी ‘मार्केट मेकर’ आहे.
भागविक्रीतून येणाऱ्या निधीचा विनियोग कंपनी घेतलेल्या कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी आणि खेळते भांडवल म्हणून करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १००० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करावा लागेल.