पीटीआय, नवी दिल्ली
झी एंटरटन्मेंटशी होऊ घातलेले विलीनीकरण बारगळल्यानंतर, सोनी समूहाने भारतात वाढीच्या अन्य संधी शोधण्यावर आणि पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. याबाबत जपानच्या सोनी समूहाचे अध्यक्ष हिरोकी तोतोकी म्हणाले की, भारत ही सर्वांना गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करणारी बाजारपेठ आहे. भारतात दीर्घकालीन विकासाच्या संधी आहेत. त्यामुळे आम्ही नवीन संधी शोधत आहेत. आम्हाला नवीन संधी मिळाल्यास आम्ही विलीनीकरण्याऐवजी तिचा विचार करू. देशातील गुंतवणुकीत कोणताही बदल करण्यात येणार नाही. सध्या फक्त आमच्याकडे त्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तोतोकी हे सोनीचे मुख्य परिचालन अधिकारी आणि मुख्य वित्तीय अधिकारीही आहेत.
सोनीची भारतीय उपकंपनी कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंट आणि झी यांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव होता. या प्रस्तावित विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीत सोनी समूहाकडून १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार होती. या पार्श्वभूमीवर तोतोकी यांनी भारतात नैसर्गिक विकासाच्या संधी शोधल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या सोनीची उपकंपनी कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंट भारतात कार्यरत आहे.
हेही वाचा >>>Gold-Silver Price on 16 February 2024: सकाळ होताच सोन्याचे दर बदलले, १० ग्रॅमची किंमत आता…
झी एंटरटन्मेंटने विलीनीकरणाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, असा दावा करत सोनी समूहाने सिंगापूरच्या आंतराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली आणि करार समापन शुल्क म्हणून सुमारे ७४८.५ कोटी रुपये झीने द्यावेत, अशी मागणी केली आहे. तर झीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) याचिका दाखल करून सोनी समूहाला विलीनीकरण योजना लागू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी, सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राने अयशस्वी विलीनीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी झीला एनसीएलटीकडे धाव घेण्यापासून रोखण्याची सोनी समूहाची अंतरिम विनंती नाकारली. दुसरीकडे एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने यासंदर्भात दाखल करून घेतलेल्या झी एंटरटेन्मेंटच्या याचिकेवर सोनीला या आधीच नोटीस बजावली आहे.