नवी दिल्ली : देशातील स्पेक्ट्रम लिलाव दुसऱ्या दिवशी बोली सुरू झाल्यानंतर काही तासांतच आटोपले. दूरसंचार कंपन्यांनी ११ हजार ३०० कोटी रुपयांच्या रेडिओ लहरी खरेदी केल्या असून, सरकारच्या अंदाजित स्पेक्ट्रम मूल्याच्या तुलनेत ही रक्कम केवळ १२ टक्के आहे. सरकारने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा स्पेक्ट्रम लिलाव केले. एकूण सात फेऱ्यात केवळ १४० ते १५० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमची विक्री झाल्याचा अंदाज आहे. यासाठी कंपन्यांनी ११ हजार ३४० कोटी रुपयांची बोली लावली.
हेही वाचा >>> आणखी १.७ ते ३.६ गिगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटरची गरज; देशात डिजिटल स्थित्यंतरामुळे वाढती मागणी
स्पेक्ट्रम लिलावात सहभागी दूरसंचार कंपन्यांचा प्रामुख्याने भर स्पेक्ट्रम नूतनीकरणावर होता. काही कंपन्यांनी क्षमता विस्तारासठी स्पेक्ट्रम खरेदी केली. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी जलद गती मोबाईल सेवेसाठी स्पेक्ट्रम खरेदी केली. कोणत्या कंपनीने किती स्पेक्ट्रमची खरेदी केली याचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. दूरसंचार मंत्रालयाच्या अहवालानुसार, प्रामुख्याने ९०० आणि १८०० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावण्यात आली. याचबरोबर तीन क्षेत्रांमध्ये कंपन्यांनी २१०० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली.