वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लोकप्रिय समाज माध्यम व्यासपीठ ‘फेसबुक’ची पालक कंपनी असलेल्या मेटाने आतापर्यंत २१ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ही अतिरिक्त मनुष्यबळ कपात बुधवारपासून सुरू झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मेटाने कंपनीच्या अंतर्गत संदेश यंत्रणेद्वारे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, रिॲलिटी लॅब्स आणि व्हॉट्सॲप या उपकपंन्यांच्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उत्तर अमेरिकेतील मेटा कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे याबाबत कळविले जाणार आहे. उत्तर अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कपातीची प्रक्रिया सुकर व्हावी, असा कंपनीचा हेतू आहे. याबाबत मेटाच्या मनुष्यबळ विभागाचे लॉरी गोलर यांनी म्हटले आहे की, मेटासाठी योगदान देणाऱ्या मित्र आणि सहकाऱ्यांना निरोप देण्याचा हा अवघड काळ आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांची पालक कंपनी असलेल्या मेटाने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचारी कपात सुरू केली. त्यावेळी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. त्यानंतर कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आणखी १० हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचा दुसरा टप्पा जाहीर केला होता.