वृत्तसंस्था, नवी दिल्ली : तंत्रज्ञानाधारित महाकाय जागतिक कंपन्या ‘ट्विटर’, ‘मेटा/ फेसबुक’, ‘अॅमेझॉन’नंतर आता ‘गूगल’मध्येदेखील नोकरकपातीचे वारे शिरले आहेत. जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी असणाऱ्या ‘गूगल’ने टप्प्याटप्प्याने १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
इतर तंत्रज्ञानाधारित कंपन्यांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना येथे अधिक वेतन दिले जात असल्याचे ‘गूगल’ची पालक कंपनी अल्फाबेटने स्पष्ट केले आहे. अल्फाबेटने प्रत्येक स्तरावरील व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांचे मानांकन ठरविण्यास सांगितले आहे. दरवर्षी एकूण कर्मचाऱ्यांमधून असमाधानकारक कामगिरी असलेले २ टक्के कर्मचारी हेरले जातात. मात्र यंदा एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत, असमाधानकारक कामगिरी असलेल्या सहा टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच सुमारे १०,००० कर्मचाऱ्यांची नावे निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.
चालू वर्षांत विविध नवउद्यमी आणि तंत्रज्ञानाधारित कंपन्यांनी आतापर्यंत १,३५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अल्फाबेटनेदेखील या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या कर्मचारी कपातीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बाजारातील प्रतिकूल परिस्थिती, हेज फंडाचा दबाव आणि कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल टाकणे अपरिहार्य ठरल्याचे तिचे म्हणणे आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि त्याआधारे त्यांनी मिळविलेले मानांकन कमी असेल अशांना सोडचिठ्ठी दिली जाणार आहे. यूके हेज फंडचे ख्रिस्तोफर हॉन यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आवश्यकच ठरले असल्याचे म्हणत या नोकरकपातीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.