नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या असलेल्या स्टेट बँकेने अल्पमुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात पाव ते पाऊण टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बँकेने ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ७५ आधारबिदूंनी (पाऊण टक्के) वाढवत ५.५० टक्क्यांवर नेला आहे. याआधी त्यावर ४.७५ टक्के दराने व्याज मिळत होते.
हेही वाचा >>> Stock Market Updates : अखेरच्या तासातील खरेदीच्या जोरावर; ‘सेन्सेक्स’ची ६७६ अंशांची कमाई
तर १८० ते २१० दिवस आणि २११ दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ६ टक्क्यांवरून वाढवून ६.२५ टक्के केला आहे. दोन कोटी रुपयांहून कमी रकमेच्या ठेवींसाठी हे नवीन दर १५ मेपासून लागू झाले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुधारित दरांवर अतिरिक्त अर्धा टक्का व्याज देय असेल. तसेच दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरातदेखील बँकेने वाढ केली आहे. ७ दिवसांपासून ते २१० दिवसांपर्यंतच्या विविध मुदतपूर्तीच्या ठेवींवरील व्याजदरात १० ते २५ आधारबिदूंची वाढ बँकेने केली आहे. तर दीर्घकालीन मुदतीच्या म्हणजेच एक वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर २० आणि २५ आधारबिदूंची वाढ केली आहे. स्टेट बँकेने विविध मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केल्याने आता इतर व्यापारी बँकांकडूनदेखील हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.