वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सलग तिसऱ्या महिन्यात निधीआधारित कर्ज दर अर्थात एमसीएलआर संलग्न कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. यामुळे या ग्राहकांची वैयक्तिक, गृह तसेच वाहन यांसारखी ग्राहक कर्जे आणखी महागणार आहेत.

स्टेट बँकेने विविध कालावधीच्या कर्जदरात १० आधारबिदूंची (०.१० टक्के) वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने सलग नवव्यांदा रेपोदर ६.५ टक्क्यांवर कायम राखून देखील स्टेट बँकेने व्याजदरात विद्यमान आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा वाढ केली आहे. बँकेने जून २०२४ पासून एमसीएलआर संलग्न कर्जाच्या व्याज दरांमध्ये एकूण ३० आधारबिदूंची वाढ केली आहे.

हेही वाचा >>>घाऊक महागाईचा जुलैमध्ये २.०४ टक्क्यांचा तिमाही नीचांक

स्टेट बँकेने एक महिना ते तीन वर्षाचा एमसीएलआर संलग्न कर्जाच्या दरात १० आधारबिंदूंची वाढ केली आहे. त्यामुळे बँकेचे विविध कालावधीसाठी कर्जाचे व्याजदर आता ८.२० टक्के ते ९.१० टक्क्यांदरम्यान गेले आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर स्टेट बँकेचे कर्ज महागल्याचा प्रतिकूल परिणाम ठरेल. वाढीव कर्जदर १५ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. मुख्य म्हणजे या बँकांचे अनुकरण करीत इतर बँका आणि गृहवित्त कंपन्यांकडूनही व्याजाचे दर वाढविले जाऊ शकतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरवाढीचे लोण अन्य बँकांतही

स्टेट बँकेपाठोपाठ बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि यूको बँकेसह इतर सरकारी बँकांनी देखील वेगवेगळ्या मुदतीतील त्यांचे एमसीएलआर संलग्न कर्जदर वाढवले आहेत. बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेने १२ ऑगस्टपासून कर्जदर वाढवले आहेत, तर यूको बँकेने विशिष्ट कालावधीसाठी लागू कर्जदरात १० ऑगस्टपासून वाढ केली आहे.

कालावधी जुने दर नवीन दर

एका दिवस ८.१ ८.२

एक महिना ८.३५ ८.४५

तीन महिने ८.४ ८.५

सहा महिने ८.७५ ८.८५

एक वर्ष ८.८५ ८.९५

दोन वर्षे ८.९५ ९.०५

तीन वर्षे ९ ९.१०

(आकडे टक्क्यांमध्ये)

Story img Loader