मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने ३१ डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत १६,८९१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ८४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने ९,१६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या ३९,८१६ कोटी रुपये पातळीवरून, ४ टक्क्यांनी वधारून ४१,४४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेचा कर्मचाऱ्यांवरील खर्च १७ टक्क्यांनी घटून १६,०७४ कोटी रुपयांवर आला आहे. वेतन सुधारणा आणि निवृत्ती वेतनावरील खर्चापोटी कराव्या लागलेल्या अधिक तरतुदींमुळे स्टेट बँकेला गेल्या वर्षीच्या नफ्यात ७,१०० कोटी रुपयांचा फटका बसला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न १,२८,४६७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत १,१८,१९३ कोटी रुपये होते. या तिमाहीत बँकेचे ढोबळ व्याज उत्पन्न १,१७,४२७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे गेल्या वर्षी १,०६,७३४ कोटी रुपये होते. बँकेचे एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण २.०७ टक्क्यांपर्यंत खाली आहे, जे आधीच्या म्हणजेच ३० सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत ते २.१३ टक्के नोंदवले गेले होते. तर निव्वळ बुडीत कर्ज गेल्या वर्षीच्या ०.६४ टक्क्यांवरून, ०.५३ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे.

गुरुवारच्या सत्रात स्टेट बँकेचा समभाग १.८० टक्के म्हणजेच १३.८० रुपयांनी घसरून ७५२.३५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, बँकेचे ६,७१,३५४ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

कर्ज आणि ठेवीत वाढ

तिमाहीत बँकेची एकूण कर्जे १३.४९ टक्क्यांनी वाढून ४०.६८ लाख कोटी रुपये झाली, जी मागील वर्षी याच तिमाहीत ३५.८४ लाख कोटी रुपये होती. तर ३० सप्टेंबर २०२४ अखेर तिमाहीत एकूण कर्जे ३९.२१ लाख कोटी रुपये होती. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशांतर्गत उद्योगधंद्यांना कर्जे ११.७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत, जी आधीच्या तिमाहीत ११.५७ लाख कोटी रुपये, तर मागील वर्षी याच तिमाहीत १०.२४ लाख कोटी रुपये होती. देशांतर्गत किरकोळ वैयक्तिक कर्जे ११.६५ टक्क्यांनी वाढून १४.४७ लाख कोटी रुपये झाली आहेत. तिमाहीदरम्यान बँकेच्या ठेवी ९.८१ टक्क्यांनी वाढून ५२.३ लाख कोटी रुपये झाल्या, ज्या मागील वर्षीच्या ४७.६२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक आहेत.

Story img Loader