मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात जूनअखेर संपलेल्या तिमाहीत जवळपास तिप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. निव्वळ व्याज उत्पन्न आणि कर्ज वितरणातील वाढीमुळे बँकेला नफ्यातील ही दमदार वाढ साधता आली आहे.
भारताच्या बँकिंग क्षेत्राच्या अग्रस्थानी असलेल्या स्टेट बँकेने लागोपाठ चौथ्या तिमाहीत कमावलेला हा विक्रमी निव्वळ नफा ठरला आहे, म्हणजे मागील चार तिमाहीत तो वाढत जात अभूतपूर्व पातळी गाठत आहे.
हेही वाचा >>> ११२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात CRCS च्या माध्यमातून आज प्रत्येकी १०००० रुपये जमा, लवकरच सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार
स्टेट बँकेला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत १६,८८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेला ६,०६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. त्यात आता तीन पटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात २४.७ टक्के वाढ होऊन ते ३८,९०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्याजापोटी नफ्याची मार्जिन (निम) २४ आधारबिंदूंनी वाढून ३.४७ टक्क्यांवर गेली आहे.
बँकेची बुडीत कर्जांवरील तरतूद मागील वर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी घसरून २,५०१ कोटी रुपयांवर सीमित राहिली आहे. या आधीच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत ही तरतूद ३,३१६ कोटी रुपये होती. बँकेच्या एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) २.७६ टक्क्यांवर घसरले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ३.९१ टक्के होते.
चढ्या व्याजदर काळात वधारलेले कर्जवितरण पथ्यावर
चालू आर्थिक वर्षात एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या खासगी क्षेत्रातील तगड्या प्रतिस्पर्धी बँकांनीही निव्वळ व्याज उत्पन्नात दोन आकडी वाढ नोंदविली आहे. कर्जांच्या मागणीत झालेली वाढ यासाठी कारणीभूत ठरली आहे. भारतीय बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ मागील काही महिन्यांत दुहेरी अंकातील आहे. रिझर्व्ह बँकेने मागील वर्षातील मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ करूनही कर्जांची मागणी कायम राहिल्याचा बँकांच्या व्यवसायावर सुपरिणाम दिसत आहे.