नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज रोख्यांच्या माध्यमातून ३०० कोटी डॉलरचा निधी उभारणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाने याला मंजुरी दिली आहे. स्टेट बँक समभाग विक्री अथवा वरिष्ठ असंरक्षित नोट्सच्या खासगी विक्रीतून एका किंवा त्यापेक्षा अधिक फेऱ्यात ही निधी उभारणी करणार आहे.
हेही वाचा >>> Sebi Investor Certification Exam : गुंतवणूकदारांसाठी ‘सेबी’कडून प्रमाणपत्र परीक्षा
अमेरिकी डॉलरच्या अथवा इतर प्रमुख परकीय चलनामध्ये ही निधी उभारणी होईल. हा उभारण्यात येणारा निधी बँक नेमका कशासाठी वापरणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत स्टेट बँकेने बॅसल ३ भांडवलाच्या पूर्ततेसाठी रोखे वितरित करीत ५०० कोटी रुपयांचा (सुमारे ६० कोटी डॉलर) निधी उभारला होता.
भारतीय बँका मागील काही काळापासून त्यांचे भांडवल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील वाढत्या कर्ज वितरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी बँका हे पाऊल उचलत आहेत. अनेक सरकारी बँका कर्ज रोख्यांच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात निधी उभारणीचे नियोजन करीत आहेत. यात कॅनरा बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक यांचा समावेश आहे.