मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक चालू आर्थिक वर्षात आणखी ५०० शाखा सुरू करेल, ज्यामुळे बँकेच्या एकूण शाखांची संख्या वर्षअखेरीस २३ हजारांवर जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी प्रतिपादन केले.
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेच्या दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल येथील शाखेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, बँकेचा १९२१ पासून मोठ्या प्रमाणात विस्तार होत गेला आहे. त्यावेळी तीन वेगवेगळ्या संस्थानांच्या बँकांचे विलीनीकरण करून इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. सरकारने १९५५ मध्ये संसदेत कायदा करून तिचे स्टेट बँकेत रूपांतर केले. बँकेच्या १९२१ मध्ये केवळ २५० शाखा होत्या. आता बँकेच्या २२ हजार ५०० शाखा कार्यरत आहेत. चालू आर्थिक वर्षात बँकेकडून आणखी ५०० शाखा सुरू केल्या जातील आणि एकूण शाखांची संख्या २३ हजारांवर पोहोचेल.
हेही वाचा : धास्तावलेल्या शेअर गुंतवणूकदारांना दिलासा; वर्षभरात २०-२५ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक बाजारात परतेल
u
स्टेट बँकेची वाढ हा जागतिक विक्रम ठरायला हवा. विशेषत: देशातील आर्थिक असमानतेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात असताना हे महत्त्वाचे आहे. देशातील एकूण ठेवींमध्ये स्टेट बँकेचा वाटा २२.४ टक्के आहे. याच वेळी ५० कोटी ग्राहकांना ही बँक सेवा देत आहेत. डिजिटल व्यवहारांमध्येही बँकेने वेगाने वाटचाल केली असून, दररोज बँकेशी संलग्न २० कोटी यूपीआय व्यवहार होत आहेत, असे सीतारामन यांनी सांगितले.