मुंबईः जागतिक पातळीवर शेअर बाजारातील कमकुवत वातावरण आणि मुख्यत: मिळकत कामगिरीबाबत साशंकतेतून माहिती-तंत्रज्ञान (आयटी) समभागांतील विक्रीच्या माऱ्याचे शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीतील घसरणीत प्रतिबिंब उमटले. तीन दिवस सलग तेजी सुरू राहिल्याने, नफावसुलीलाही गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिल्याने ही घसरण दिवसभर विस्तारत गेली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२३.४९ अंशांच्या घसरणीने ७६,६१९.८३ वर दिवसअखेर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०८.६० अंशांनी घसरून २३,२०३.२ पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे ०.५५ टक्के आणि ०.४७ टक्क्यांचे नुकसान सप्ताहाअखेरच्या व्यवहारात सोसले. परकीय गुंतवणूकदारांची अव्याहत विक्री तर, १० दिवसांवर असलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर सावध नजर ठेवून देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदीलाही ओहोटी लागल्याने, शुक्रवारच्या संपूर्ण सत्रावर पुन्हा एकदा अस्थिरतेची छाया दिसून आली.
हेही वाचा >>> दोन आर्थिक वर्षांत ६.७ टक्के विकास दराने भारताचे मार्गक्रमण – जागतिक बँक
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या कंपन्या इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे निकाल मागील दोन दिवसांत जाहीर झाले. त्यांची महसुली कामगिरी ही विश्लेषकांच्या अपेक्षेच्या विपरीत असल्याने सरलेल्या आठवड्यात दोन्ही समभांगात अनुक्रमे सुमारे ७.७ टक्के आणि १० टक्के अशी घसरण झाली आहे. निफ्टी निर्देशांकांतील हे प्रमुख समभाग ढासळल्याने, निफ्टीतील साप्ताहिक घसरणही जवळपास १ टक्क्याची राहिली. गुरुवारी निकाल जाहीर करणाऱ्या इन्फोसिसच्या समभागांत शुक्रवारी ५.९ टक्क्यांची घसरण झाली. दुसरीकडे निकाल निराशेने ॲक्सिस बँकेचा समभाग ४.७१ टक्के घसरणीसह ९९१.२५ रुपयावर स्थिरावला. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेतही जवळपास १ टक्क्याची घसरण झाली. एकंदर सर्वच बँकांचे समभाग विक्रीमुळे नरमलेले दिसून आले.
हेही वाचा >>> परकीय चलन गंगाजळी घटून ६२५ अब्ज डॉलरवर; उच्चांकी पातळीपासून ८० अब्ज डॉलरचे नुकसान
‘रिलायन्स’ची ३ टक्क्यांनी मुसंडी
अपेक्षेपेक्षा सरस अशी निव्वळ नफ्यातील ७.४ टक्के वाढीची कामगिरी आणि विशेष म्हणजे किराणा व्यवसायातील महसुली कामगिरीत दिसलेली उभारी तसेच दूरसंचार व डिजिटल व्यवसायाची उन्नत वाटचाल, या घटकांमुळे शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने सुमारे तीन टक्क्यांची झेप घेतली. अलीकडच्या दिवसांत रिलायन्समध्ये अशा प्रकारची तेजी अपवादानेच दिसून आली आहे. दिवसअखेर २.८३ टक्के वाढीसह शेअरचा भाव १,३०२.३५ रुपयांवर स्थिरावला. सकाळच्या सत्रात त्याने १,३२६ रुपयांपुढे मजल मारली होती.
आकडे –
सेन्सेक्स – ७६,६१९.८३ घसरण ४२३.४९ (-०.५५ टक्के)
निफ्टी – २३,२०३.२ घसरण १०८.६० (-०.४७ टक्के)
डॉलर – ८६.६२ वाढ १ पैसा
ब्रेंट क्रूड – ८१.४३ वाढ ०.१७ टक्के