मुंबई: इराण-इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला असून युद्ध भडकण्याच्या भीतीने जगभरातील भांडवली बाजारांत गुरुवारी पडझड झाली. जपानमधील व्याजदर वाढीला प्रतिकूल घडामोडी आणि डॉलरच्या तुलनेत येनच्या निरंतर घसरणीनेही विपरीत परिणाम साधला. देशांतर्गत बाजारातही रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याने, सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकात २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
गुरुवारी सलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण झाली असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारी आणखी १,७६९.१९ अंश म्हणजेच २.१० टक्क्यांचे नुकसान सोसले. परिणामी, दिवसअखेर हा निर्देशांक ८२,४९७.१० पातळीवर स्थिरावला. दिवभरात त्याने १,८३२.२७ अंश गमावत ८२,४३४.०२ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येदेखील २.१२ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ५४६.८० अंशांच्या नुकसानीसह २५,२५०.१० पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>>कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
परकीय निधीचा आटलेला ओघ आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली आहे. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर देशांतर्गत भांडवली बाजाराने युद्ध भडकण्याच्या धसक्याने गेल्या काही सत्रातील तेजी निमाली आहे. शिवाय इस्रायलकडूनदेखील या हल्ल्याला उत्तर दिले जाईल या भीतीने बाजारात गुंतवणूकदार चिंताक्रांत आहेत. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने वायदे बाजारासंबधी केलेल्या नवीन बदलांमुळे व्यापक बाजारपेठेतील व्यवहारांचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. याबरोबरच चीनमधील कंपन्यांच्या आकर्षक मूल्यांकनांमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार तिकडे वळत असल्याने भारतीय समभागांवर दबाव वाढला आहे, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, मारुती, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्र बँक, टायटन, अदानी पोर्ट्स आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाली. यात एकमेव जेएसडब्ल्यू स्टीलचा समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाला. मंगळवारच्या सत्रात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५,५७९.३५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
घसरणीमागील प्रमुख कारणे काय?
– इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, इस्रायलकडून प्रतिहल्ल्याची तयारी
– खनिज तेलाच्या किमतीत वाढ
– जपानमधील व्याजदर वाढील प्रतिकूल घडामोडी आणि चलनांतील घसरण
– परदेशी संस्थात्मक गुंतवणूक प्रवाहाचे भारताकडून चीनकडे वळण
– सेबीच्या वायदे बाजारातील नवीन नियम बदलांमुळे व्यवहार घटण्याची शक्यता
गुंतवणूकदारांना ९.७८ लाख कोटींची झळ
गुरुवारच्या सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ९.७८ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. सेन्सेक्समधील २ टक्क्यांहून अधिक घसरणीने मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९.७८ लाख कोटींनी घटून ४६५.०७ लाख कोटी रुपयांपर्यंत (५.५४ ट्रिलियन डॉलर) खाली आले आहे. भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमधून परदेशी निधी माघारी जाण्याच्या आणि अलीकडील चिनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तेथील सरकारने योजलेल्या उपायांमुळे निधी तिकडे वळण्याच्या दुहेरी धोक्याने देशांतर्गत आघाडीवर बाजारात चिंतेचे वातावरण आहे.
सेन्सेक्स ८२,४९७.१० -१,७६९.१९ (-२.१०%)
निफ्टी २५,२५०.१० -५४६.८० -२.१२
डॉलर ८३.९६ १४
तेल ७४.९१ १.३७