मुंबई: किरकोळ गुंतवणुकीवरही झटपट लाभ, प्रक्रिया सुलभ करणारे ॲप आणि समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या मोबदल्याच्या सुरस कहाण्यांचा एकत्रित प्रभाव यातून भांडवली बाजारातील नवगुंतवणूकदारांची रीघही वाढताना दिसत आहे. सरलेल्या २०२४ या वर्षांत आतापर्यंत सुमारे २.३३ कोटी नोंदणीकृत नवीन गुंतवणूकदारांची भर राष्ट्रीय शेअर बाजाराने घातली आहे. यामध्ये वर्षभरात सर्वाधिक ३३ लाख नवगुंतवणूकदारांच्या नोंदीसह उत्तर प्रदेशने पहिला क्रमांक पटकावला असून, या प्रदेशाची या आघाडीवरील उसळी ही गुंतवणूकदारांच्या संख्येत अव्वल असलेल्या महाराष्ट्र, गुजरातमधील दरी वेगाने भरून काढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय शेअर बाजाराने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर उत्तर प्रदेशमधील नवगुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक ३२.९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. भांडवली बाजारात गुंतवणूकदारांच्या बाबतीत महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये परंपरेने अग्रेसर राहिली आहेत. महाराष्ट्राने २८ डिसेंबर २०२४ पर्यंत ३० लाख नवीन गुंतवणूकदारांची (२९.७ टक्के) भर घातली, तर गुजरातमधून १९ लाख नवीन गुंतवणूकदार (१८.९ टक्के) नोंदवले गेले. या तुलनेत उत्तर प्रदेशमधून ३३ लाख नवीन गुंतवणूकदारांची नोंद झाली. या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या एकूण संख्येबाबतही उत्तर प्रदेशने दुसरे स्थान मिळवित गुजरातला पिछाडीवर टाकले आहे. गुंतवणूकदारांच्या एकूण १.७९ कोटींच्या संख्येसह महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये २८ डिसेंबरअखेर अनुक्रमे १.२३ कोटी आणि ९६ लाख गुंतवणूकदार आहेत.

हेही वाचा : Bank holidays 2025: २०२५मध्ये बँक किती दिवस बंद राहणार? RBI ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी!

राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या २६ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत १०.६ कोटींवर पोहोचली आहे, तर खात्यांच्या संख्येने २१.१ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. उल्लेखनीय म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमधील नवीन गुंतवणूकदारांची वाढीचा टक्का अनुक्रमे ३२.९ टक्के, २९.७ टक्के आणि १८.९ टक्के आहे.

कोणते जिल्हे अव्वल

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी परिसरांतून (एनसीआर) सर्वाधिक १३.९ लाख गुंतवणूकदारांची भर पडली. त्यापाठोपाठ मुंबईतून ९.६ लाख, पुणे ३.३ लाख, सुरत आणि अहमदाबादने प्रत्येकी ३.२ लाख नवीन गुंतवणूकदार जोडले आहेत.

हेही वाचा : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहे सोन्याचा दर? मुंबई ते पुणे, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे भाव

प्राथमिक बाजार आकर्षणाचे केंद्र

सरलेले कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये ३०१ कंपन्या राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्या. त्यापैकी मुख्य बाजार मंचावर ९० कंपन्यांनी तर लघू व मध्यम मंचावर (एनएसई इमर्ज) १७८ कंपन्यांनी नशीब आजमावले. या सर्व कंपन्यांनी एकत्रितपणे १.६७ लाख कोटी रुपयांची निधी उभारणी केली. वर्ष २०२४ ने निधी उभारणीचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यामध्ये ह्युंदाई मोटर इंडियाने सर्वाधिक २७,८५९ कोटी रुपयांची निधी उभारणी केली. तर विभोर स्टील ट्यूब्सचा ७२ कोटी रुपयांचा सर्वाधिक लहान आकारमान असलेला ‘आयपीओ’ ठरला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market investments 27 percent increase in the number of share investors in 2024 print eco news css